'माझ्या २ सिक्समुळे नाही, या खेळाडूमुळे जिंकलो', रोहितची कबुली

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० मॅचमध्ये भारताचा सुपर ओव्हरमध्ये रोमांचक विजय झाला.

Updated: Jan 30, 2020, 05:09 PM IST
'माझ्या २ सिक्समुळे नाही, या खेळाडूमुळे जिंकलो', रोहितची कबुली title=

हॅमिल्टन : न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० मॅचमध्ये भारताचा सुपर ओव्हरमध्ये रोमांचक विजय झाला. सुपर ओव्हरच्या शेवटच्या २ बॉलवर भारताला विजयासाठी १० रनची गरज होती. या दोन्ही बॉलवर सिक्स मारून रोहित शर्माने भारताला जिंकवून दिलं. न्यूझीलंडविरुद्धच्या या विजयाचं श्रेय रोहित शर्माने मोहम्मद शमीला दिलं आहे.

'मोहम्मद शमीने टाकलेली शेवटची ओव्हर महत्त्वाची होती. माझ्या २ सिक्समुळे नाही तर, शमीच्या त्या ओव्हरमुळेच आमचा विजय झाला. मैदानात दव होतं, त्यामुळे शेवटच्या ओव्हरमध्ये ९ रन वाचवणं सोपं नव्हतं,' असं रोहित सामन्यानंतर म्हणाला.

अशी होती थरारक शेवटची ओव्हर

२०व्या ओव्हरमध्ये न्यूझीलंडला विजयासाठी ९ रनची गरज होती. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन ९५ रनवर आणि रॉस टेलर ७ बॉलमध्ये १० रनवर खेळत होता. ओव्हरच्या पहिल्याच बॉलला रॉस टेलरने सिक्स मारला.

रॉस टेलरच्या सिक्ससोबतच मॅच भारताच्या हातातून गेल्याचं वाटत होतं, कारण आता न्यूझीलंडला विजयासाठी फक्त ३ रनची गरज होती. ओव्हरच्या दुसऱ्या बॉलला रॉस टेलरने एक रन काढून केन विलियमसनला स्ट्राईक दिला. ९५ रनवर खेळत असलेला केन विलियमसन त्याच्या शतकापासून फक्त एक सिक्स दूर होता. ज्या पद्धतीने केन विलियमसनने या मॅचमध्ये भारतीय बॉलरचा समाचार घेतला त्यावरुन तो सिक्स मारून न्यूझीलंडला जिंकवेल आणि त्याचं शतक पूर्ण करेल, असंच वाटत होतं.

ओव्हरच्या तिसऱ्या बॉलला मोहम्मद शमीने टाकलेला बाऊन्सर विलियमसनने थर्ड मॅनला मारण्याचा प्रयत्न केला. पण विलियमसनच्या बॅटला बॉल लागून तो थेट विकेट कीपर केएल राहुलच्या हातात गेला.

विलियमसन आऊट झाल्यानंतर न्यूझीलंडला विजयासाठी ३ बॉलमध्ये २ रनची गरज होती. मैदानात नव्याने आलेल्या टीम सायफर्टला ओव्हरच्या चौथ्या बॉलवर एकही रन काढता आली नाही. शमीचा पाचवा बॉलही सायफर्टच्या बॅटला न लागता विकेट कीपर राहुलच्या हातात गेला. तरीही सायफर्टने एक रन काढून टेलरला स्ट्राईक दिला. आता न्यूझीलंडला शेवटच्या बॉलवर विजयासाठी १ रनची गरज होती, पण शमीने यॉर्कर टाकून टेलरला बोल्ड केलं आणि मॅच टाय झाली. अखेर या मॅचचा निर्णय सुपर ओव्हरमध्ये लागला.