India vs New Zealand 1st Test Rishabh Pant Injury: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या दृष्टीने भारतीय संघासाठी महत्त्वाच्या असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्याच कसोटीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाची दयनीय अवस्था झाली आहे. बंगळुरुमधील पहिल्या कसोटीचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेल्याने गुरुवारी दुसऱ्या दिवशी भारतीय संघ अवघ्या 46 धावांवर तंबूत परतला. त्यानंतर न्यूझीलंडच्या संघाने 134 धावांची आघाडी घेत भारतीय संघाला बॅकफूटवर टाकलं. अशातच भारताला आणखीन एक धक्का बसलाय तो यष्टीरक्षक ऋषभ पंत जखमी झाल्याने. दुसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात पंत जखमी झाल्याने तो इतरांच्या मदतीने मैदानाबाहेर लंगडतच पडला. पंतला झालेली दुखापत किती गंभीर आहे यासंदर्भात कर्णधार रोहित शर्माने महत्त्वाची माहिती दुसऱ्या दिवसाच्या खेळानंतर दिली.
ऋषभ पंत न्यूझीलंडचा संघ फलंदाजी करत असताना 37 व्या ओव्हरला जखमी झाला. रविंद्र जडेजाचा फिरता चेंडू अडवण्याच्या नादात पंत जखमी झाला. जडेजाने ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना टाकलेला चेंडू थेट पंतच्या गुडघ्याला लागला आणि तो विव्हळत मैदानात आडवा झाला. ऋषभ पंत जखमी झाल्यानंतर राखीव यष्टीरक्षक ध्रुव जुरैलने त्याची जागा घेतली. मात्र पंतला झालेली दुखापत किती गंभीर आहे यासंदर्भात रोहित शर्माने माहिती दिली. रोहित शर्माने सर्वच चाहत्यांची चिंता वाढवणारी माहिती दिली आहे.
"त्याच्या गुडघ्याला सूज आली आहे. त्याच्या ज्या गुडघ्यावर शस्रक्रिया झाली आहे त्याला सूज आली आहे. आम्हाला त्याच्याबाबत कोणताही धोका पत्करायचा नाहीये. अपेक्षा आहे की तो या सामन्यात पुन्हा खेळताना दिसेल," अशी अपेक्षा रोहितने पंतच्या दुखापतीबद्दल बोलताना म्हटलं आहे. तिसऱ्या दिवशी पंत मैदानात फिल्डींगसाठी उतरणार नाही असंही बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय तज्ञांची एक टीम पंतच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहे.
नक्की वाचा >> भारत 46 वर All Out होणार हे 'या' खेळाडूला 10 वर्षांपूर्वीच ठाऊक होतं? 'त्या' पोस्टमुळे खळबळ
ऋषभ पंत 2022 साली डिसेंबर महिन्यामध्ये स्वत:च्या घरी जाताना कार अपघात झाल्याने त्यामध्ये गंभीर जखमी झाला होता. पंतचा जीव थोडक्यात वाचला होता. मात्र या अपघातात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. पंत जवळपास 18 महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. त्याच्यावर मुंबईमध्ये विशेष शस्रक्रीया करण्यात आली. त्यानंतर तो अनेक महिने बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत होता. त्यानंतर पंतने दमदार पुनरागमन केलं.
टी-20 वर्ल्ड कपबरोबरच एकदिवसीय वर्ल्ड कपमध्येही त्याने चमकदार कामगिरी केली. विशेष म्हणजे बांगलादेशविरुद्ध नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेमध्ये त्याने जवळपास दोन वर्षानंतर पुनरगामन केलं ते थेट शतकी खेळीने. त्यामुळेच आता भविष्यातील अनेक आयसीसी स्पर्धांसाठी पंत हा भारतीय संघाचा महत्त्वाचा भाग आहे. आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप, त्यानंतरची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धांसाठीही संघ बांधणी करताना पंतचा विचार मुख्य संघासाठी केला जात असल्याने त्याचं असं जखमी होणं संघासाठी चिंतेची बाब असल्याचं सांगितलं जात आहे.