IND vs ENG: इंग्लंडविरोधातील चौथ्या कसोटी सामन्यातून गोलंदाज आकाश दीपने भारतीय संघात पदार्पण केलं आहे. आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने 3 विकेट्स मिळवत संधीचं सोनं केलं आहे. पण आपलं हे यश पाहण्यासाठी वडील नसल्याची खंत आकाश दीपला आहे. 2015 मध्ये त्याच्या वडिलांचं निधन झालं. आपण आयुष्यात काहीतरी व्हावं असं वडिलांचं स्वप्न होतं आणि आपण ते पूर्ण केल्याचा आनंद असल्याचंही त्याने म्हटलं आहे.
आकाश दीपचे वडील रामजी सिंग यांना अर्धांगवायू झाला होता. त्यातून त्यांनी जीव गमावला होता. यानंतर सहा महिन्यातच वाराणसीच्या रुग्णालयात नेत असताना त्याने आपला मोठा भाऊही गमावला. "एकाच वर्षात माझे वडील आणि भाऊ यांना गमावल्यानंतर आपण आयुष्यात काहीतरी करायला हवं असं मला वाटलं. यानंतर मी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. माझ्याकडे गमावण्यासारखं काही नव्हतं, पण जिंकण्यासाठी फार होतं," असं त्याने पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर प्रसारमाध्यमांसी संवाद साधताना सांगितलं.
पहिल्या सामन्यात आकाश दीपने जबरदस्त खेळी करत इंग्लंडच्या पहिल्या तीन फलंदाजांना तंबूत धाडलं. "मी हे सर्व माझ्या वडिलांना समर्पित करत आहे. कारण आपल्या मुलाने आयुष्यात काहीतरी करावं असं त्यांचं स्वप्न होतं. ते जिवंत असताना मी काही करु शकलो नाही. त्यामुळे माझी ही कामगिरी त्यांना समर्पित आहे," अशा भावना त्याने व्यक्त केल्या.
"प्रत्येक क्रिकेटरचं भारतीय क्रिकेट संघासाठी खेळण्याचं स्वप्न असत. माझंही तेच स्वप्न होतं. मोठे होत असताना आम्हाला क्रिकेटबद्दल फार काही माहिती नव्हतं. मी जिथे होतो तिथे क्रिकेटचा इतका संबंध नव्हता. मी 2007 नंतर टेनिस क्रिकेट खेळलो. 206 नंतर मला क्रिकेटबद्दल समजलं. तेव्हापासून मी मोहम्मद शमी आणि रबाडा यांना फॉलो करत आहे," अशी माहिती त्याने दिली.
"माझ्या गावापासून (बिहार) तसंच जेथून खेळलो (पश्चिम बंगाल) तेथून जवळ असणाऱ्या ठिकाणी मला टेस्ट कॅप मिळाली आहे. बंगालने मला पाठिंबा दिला. माझ्या प्रवासात कुटुंबाने महत्वाची भूमिका निभावली," असं त्याने म्हटलं.
"माझं कुटुंबही येथे आहे. हे नक्कीच भावनिक आहे यात काही शंका नाही. पण आपण संघासाठी कशाप्रकारे योगदान देऊ शकतो ही एकच गोष्ट माझ्या डोक्यात आहे," असं आकाश दीपने म्हटलं आहे. राहुल द्रविडकडून टोपी मिळाल्याबद्दल विचारण्यात आलं असता त्याने सांगितलं की, "त्यांनी माझ्याबद्दल ऐकलं होतं. मी त्यावेळी फार भावनिक झालो होतो. मला आतापर्यंत जसा खेळला आहेस तसाच खेळण्यास सांगण्यात आलं. मला हे फार मदत करणारं होतं. कारण अशा क्षणी तुम्ही फार गोंधळलेले असता".
आपल्याला बुमराहने सल्ला दिल्याचंही आकाश दीपने सांगितलं. “बुमराह भाईने मला सांगितलं की, आंतरराष्ट्रीय स्तरावर एखाद्याने किंचितशी आखूड गोलंदाजी करायला हवी. कारण फलंदाजांची चेंडूचा पाठलाग करण्याची प्रवृत्ती असते. त्यामुळे, ते माझ्या मनात होते आणि योग्य लाइन आणि लेन्थ गोलंदाजी करण्याची योजना होती,” असं आकाश दीपने सांगितलं.
"मी काय केलं माहिती नाही, पण जेव्हा कधी मी सामना खेळायचो तेव्हा ती माझ्या आयुष्यातील शेवटची मॅच आहे असाच विचारु करुन खेळायचो. जेव्हा कधी मला यश मिळतं तेव्हा मी ते पुढील सामन्यात नेण्याचा प्रयत्न करतो," असं आकाश दीप म्हणाला.