डेव्हिड वॉर्नर अचानक उजव्या हाताने का खेळू लागला? ऑस्ट्रेलियन खेळाडूचा खुलासा, म्हणाला 'त्याला फार...'

भारत-ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात डेव्हिड वॉर्नर आर अश्विनच्या गोलंदाजीवर अचानक उजव्या हाताने फलंदाजी करु लागला होता. यानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली होती.   

शिवराज यादव | Updated: Sep 26, 2023, 11:34 AM IST
डेव्हिड वॉर्नर अचानक उजव्या हाताने का खेळू लागला? ऑस्ट्रेलियन खेळाडूचा खुलासा, म्हणाला 'त्याला फार...' title=

भारत-ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अनेक रेकॉर्ड्सची नोंद झाली. भारताने हा सामना 99 धावांनी जिंकला. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरदेखील आपल्या फलंदाजीमुळे चर्चेत होता. याचं कारण आर अश्विनच्या गोलंदाजीचा सामना करताना डेव्हिड वॉर्नर अचानक उजव्या हाताने खेळू लागला होता. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू सीम अॅबॉटने मैदानात भारतीय गोलंदाज ज्या पद्दतीने चेंडू वळवत होते ते पाहता डेव्हिड वॉर्नरने ही शक्कल वापरल्याचं म्हटलं आहे. 

भारताने ऑस्ट्रेलिया संघासमोर 399 धावांचा डोंगर उभा केला. 5 गडी गमावत भारताने ही धावसंख्या उभारली होती. ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नर आणि अॅबॉटने झुंज देण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश आलं नाही आणि ऑस्ट्रेलियाने सलग दुसरा एकदिवसीय सामना गमावला.

डेव्हिड वॉर्नरने फलंदाजी करताना डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही हातांनी फलंदाजी केली. डेव्हिड वॉर्नर आपल्या या विशिष्ट शैलीसाठी तसा प्रसिद्धच आहे. पण रविवारी आर अश्विनचा सामना करताना त्याने उजव्या हातानेच फलंदाजी करण्यास सुरुवात केली होती. अश्विनला एक चौकार लगावल्यानंतर पुढच्याच चेंडूवर डेव्हिड वॉर्नर बाद झाला. 

दरम्यान डेव्हिड वॉर्नर उजव्या हाताने फलंदाजी का करत होता याचा खुलासा त्याचा सहकारी सीम अॅबॉटने केला आहे. "मला वाटतं ही आऱ अश्विनच्या कौशल्याची चाचणी होती. कारण डेव्हिड वॉर्नर फक्त बसून पाहणाऱ्यातला नाही. आर अश्विन आपली लेंथ काही चुकवणार नव्हता. चेंडू वळत असल्यानेच डेव्हिड वॉर्नरने त्याचा सामना करण्याच्या हेतूने ही शक्कल लढवली होती," अशी माहिती सीम अॅबॉर्टने दिली आहे.

"डेव्हिडला आपण खेळण्यात बदल करावा असं वाटलं होतं. तो उजव्या हाताने गोल्फ खेळतो. तो किती चांगल्या पद्धतीने बाजू बदलून खेळू शकतो हे आपण पाहिलं आहे. त्यामुळेच त्याने हा पर्याय निवडला. त्याने सराव करताना नेट्समध्ये अनेकदा हे शॉट्स खेळले आहेत. तो एक उत्तम स्पर्धक आहे," असं सीम अॅबॉर्टने सांगितलं आहे.

इंदूरच्या मैदानात भारतीय फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली. पण ऑस्ट्रेलियन फलंदाजांना सूर गवसला नाही. आर अश्विन आणि रवींद्र जाडेजाला खेळण कठीण गेल्याची कबुली सीम अॅबॉर्टने दिली आहे. "अखेरच्या षटकांमध्ये गोलंदाजी करणं थोडं कठीण गेलं. त्यांचे फिरकी गोलंदाज चांगली कामगिरी करत होती. त्यांच्यात फार कौशल्य आहे. त्यांचा सामना करण्यासाठी आम्हाला मेहनत घ्यावी लागणार आहे," असं सीम अबॉर्टने म्हटलं.