IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघाचा सामना म्हटला की अनेकजण नोकरीला दांडी मारतात, अनेक मंडळी एकत्र भेटून या सामन्याचा आनंद घेतात. पण, हे चित्र सहसा क्रिकेट सामन्यांच्याच वेळी पाहायला मिळतं. मागील काही वर्षांमध्ये ही परिस्थिती धीम्या गतीनं का असेना पण बदलताना दिसत आहे. कारण, ठरतंय ते म्हणजे विविध खेळांमध्ये भारतीय खेळाडूंची अतुलनीय कामगिरी. सध्याच्या घडीला याच भारतीय खेळाडूंनी हॉकीचं मैदान गाजवलं आहे. ज्यामुळं त्यांच्यावर चहुबाजूंनी कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.
बुधवारी पार पडलेल्या एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 (Asian Champions Trophy 2023) मध्ये भारतीय हॉकीपटूंनी पाकिस्तानच्या संघावर एकतर्फी विजय मिळवला. चेन्नई येथील मेयर राधाकृष्णन स्टेडियममध्ये टीम इंडियानं पाकिस्तानचा 4- 0 असा धुव्वा उडवत थेट उपांत्य सामन्यात धडक मारली.
India outshines Pakistan, seizing a spectacular 4-0 victory and marching confidently into the semifinals!
India 4-0 Pakistan #HockeyIndia #IndiaKaGame #HACT2023 #IndvsPak@CMO_Odisha @CMOTamilnadu @asia_hockey @FIH_Hockey @IndiaSports @Media_SAI @sports_odisha pic.twitter.com/XApEYnWV4v
— Hockey India (@TheHockeyIndia) August 9, 2023
हाफ टाईमनंतर पाकिस्तानच्या संघानं सामन्यात परतण्याचा प्रयत्न करण्याआधीच जुगराज सिंगनं 36 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल केला आणि भारतानं सामन्यात 3- 0 अशी आघाडी घेतली. या भक्कम आघाडीनंतर भारतीय संघाचं वर्चस्व सामन्यावर पाहायला मिळालं. इथं संघानं बुद्धिचातुर्यानं आपल्या खेळाचा वेग मंदावला. सामना संपता संपता पाकिस्ताना गोल करण्याची एक संधी मिळालीसुद्धा पण, अरशद लियाकतच्या शॉटला भारतीय गोलकीपर कृष्ण पाठकनं सहजपणे रोखलं.
आतापर्यंत भारत आणि पाकिस्तानचा संघ 179 वेळा आमनेसामने आला, यामध्ये भारतानं 65 तर पाकिस्तानच्या संघानं 82 सामन्यांमध्ये विजय मिळवला. यामधील 32 सामने अनिर्णित राहिले. दरम्यान मागच्या काही काळातील भारतीय संघाची कामगिरी पाहता मागील 15 सामन्यांमध्ये संघानं पराभव पाहिला नाहीये. यातील 13 सामने संघ जिंकला तर, दोन सामने अनिर्णित राहिले. आता उपांत्य सामन्यात संघाची नेमकी कशी कामगिरी असेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.