हॅमिल्टन : न्यूझीलंडविरुद्धच्या ५ वनडे मॅचच्या सीरिजमध्ये भारताचा तिसऱ्याच मॅचमध्ये विजय झाला. यामुळे शेवटच्या २ वनडे मॅचमध्ये भारतीय टीम नवीन चेहऱ्यांना संधी देईल, अशी चर्चा सुरु झाली आहे. उरलेल्या शेवटच्या २ वनडे आणि ३ टी-२० मॅचच्या सीरिजमध्ये कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. विराटच्याऐवजी रोहित शर्माकडे भारतीय टीमचं नेतृत्व देण्यात आलं आहे. टीमचं नेतृत्व मिळालेल्या रोहित शर्माला भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं सल्ला दिला आहे. शेवटच्या २ वनडे मॅचमध्ये शुभमन गिलला खेळवण्यात यावं, असं सौरव गांगुलीला वाटतंय.
२०१८ साली झालेल्या अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये शुभमन गिलनं ३७२ रन केल्या होत्या. शुभमन गिलच्या या कामगिरीमुळे भारतानं अंडर-१९ वर्ल्ड कपवर नाव कोरलं होतं. शुभमन गिल हा आता आंतरराष्ट्रीय मॅच खेळण्यासाठी तयार आहे, असं सौरव गांगुली म्हणाला. शुभमन गिल उरलेल्या २ मॅचमध्ये खेळला तर भारताला २०१९ वर्ल्ड कपसाठी आणखी एक चांगला खेळाडू मिळू शकतो, अशी प्रतिक्रिया गांगुलीनं दिली.
२०१८ सालच्या पहिल्याच आयपीएल मोसमात शुभमन गिलनं कोलकात्याकडून खेळताना २०३ रन केल्या होत्या. रणजीमध्ये पंजाबकडून खेळताना १९ वर्षांच्या शुभमन गिलनं तामीळनाडूविरुद्ध ३२८ बॉलमध्ये २६८ रनची खेळी केली होती.
तिसऱ्या वनडेनंतर विराट कोहलीनंही शुभमन गिलचं कौतुक केलं होतं. मी १९ वर्षांचा असताना शुभमन गिलच्या १० टक्केही नव्हतो, असं विराट म्हणाला होता. कर्णधाराकडून अशी पावती मिळणं हे कौतुकास्पद असल्याचंही वक्तव्य गांगुलीनं केलं.
शुभमन गिलला नेटमध्ये सराव करताना मी पाहिलं आहे. त्याला पाहून मी हैराण झालो. असाधारण प्रतिभा असलेले खेळाडू समोर येत आहेत. पृथ्वी शॉनंही दिलेल्या संधीचा फायदा उठवल्याची प्रतिक्रिया विराटनं दिली.
शुभमन गिलविषयी बोलताना कोहली म्हणाला 'त्याच्यामध्ये असाच आत्मविश्वास राहिला आणि त्याच्या खेळाचा स्तर सुधारला, तर ते भारतीय क्रिकेटसाठी चांगलं असेल. टीममध्ये येणारे खेळाडू प्रभाव पाडतात, त्यांना संधी देताना आणि विकसित व्हायला मदत करताना आनंद होतो.'
भारत आणि न्यूझीलंडमधली चौथी वनडे गुरुवार ३१ जानेवारीला हॅमिल्टनमध्ये होणार आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये एमएस धोनी मांडीच्या स्नायूंना झालेल्या दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. सध्या धोनीच्या दुखापतीबद्दल माहिती मिळू शकलेली नाही. तसंच धोनीच्या खेळण्याविषयी टॉस आधी निर्णय घेण्यात येणार आहे. जर धोनी ही मॅच खेळणार नसेल, तर विराट कोहलीच्या जागी शुभमन गिलची वर्णी लागू शकते. पण धोनी या मॅचमध्ये खेळणार असेल, तर मात्र गिलला वाट बघावी लागू शकते.
रोहित शर्मानं शुभमन गिल आणि धोनी दोघांना खेळवण्याचा निर्णय घेतला, तर मात्र अंबाती रायुडू किंवा दिनेश कार्तिक यांच्यापैकी एकाला विश्रांती द्यावी लागेल. तिसऱ्या वनडेमध्ये रायुडू आणि कार्तिकनं नाबाद खेळी करून भारताच्या विजयात मोलाची कामगिरी केली होती. त्यामुळे टीम निवड करताना रोहितची डोकेदुखी वाढणार, हे मात्र नक्की.