IND vs NZ, 3rd Odi : तिसऱ्या सामन्यातही पावसाचा खोडा, टीम इंडियावर मालिका पराभवाचं संकट

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामन्यात पाऊसाची बॅटिंग सुरु आहे.  

Updated: Nov 30, 2022, 02:33 PM IST
IND vs NZ, 3rd Odi : तिसऱ्या सामन्यातही पावसाचा खोडा, टीम इंडियावर मालिका पराभवाचं संकट title=
छाया सौजन्य : बीसीसीआय

वेलिंग्टन : टीम इंडियाच्या न्यूझीलंड दौऱ्याच्या (India Tour Of New Zealand 2022) सुरुवातीपासून पाऊस (Rain) 'गेम' करतोय. या दौऱ्यातील मालिकांमध्ये सातत्याने पावसाच्या व्यत्ययामुळे सामने मध्येच थांबवावे लागलेत. टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तिसऱ्या सामन्यातही पावसाने खोडा घातलाय. यामुळे सामना 12 वाजून 57 मिनिटांपासून थांबवण्यात आलाय. खेळ थांबवण्यात आला तेव्हा न्यूझीलंडची धावसंख्या 18 षटकांमध्ये 1 बाद 104 अशी होती. दरम्यान हा सामना रद्द होण्याची शक्यता असल्याने टीम इंडियावर मालिका पराभवाचं संकट आहे. या 3 सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंड 1-0 ने आघाडीवर आहे.  (ind vs nz 3rd odi has been stopped due to rain match may be canceled)

पावसामुळे आधीच उशीरा सुरुवात झाली. त्यात आता न्यूझीलंडच्या डावातील 18 ओव्हरचा खेळ संपला त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. आता ख्राईस्टचर्चमध्ये आणखी जोरदार पाऊसला सुरुवात झाल्याचं म्हटलं जातंय. न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर टीम इंडियाने 47.3 ओव्हरमध्ये 219 धावांवर शरणागती पत्कराली. त्यानंतर न्यूझीलंड 220 धावांच्या विजयी आव्हानासाठी मैदानात आली.

 न्यूझीलंडची जोरदार सुरुवात झाली. न्यूझीलंडने सलामीसाठी 97 धावांची भागीदारी केली. न्यूझीलंडला फिन एलेनच्या रुपात पहिला धक्का बसला. उमरान मलिकने एलेनला सूर्यकुमार यादवच्या हाती 57 धावांवर कॅच आऊट केलं. त्यानंतर कॅप्टन केन विलियमसन मैदानात आला. या  दरम्यान दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 7 धावा जोडल्या. अशाप्रकारे न्यूझीलंडची धावसंख्या 18 ओव्हरमध्ये 104 वर पोहचली. मात्र गेल्या काही तासापासून पावसाची बॅटिंग सुरु असल्याने सामना थांबण्यात आलाय. 

न्यूझीलंड या मालिकेतील विजयी सलामी दिली होती. त्यानंतर दुसरा सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे तिसरा सामना हा सीरिज डिसायडर आहे. मात्र पाऊसामुळे सामना थांबवण्यात आल्याने टीम इंडियावर मालिका गमावण्याचं संकट ओढावण्याची शक्यता आहे. यामुळे सामना रद्द होतो की पुन्हा सुरुवात होते, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.