Ind vs Ban Test Nets: भारतीय संघातील तरुण खेळाडू तसेच सलामीवीर यशस्वी जयसवालने संघ व्यवस्थापनाचं टेन्शन वाढवलं आहे. कसोटी करिअरची भन्नाट सुरुवात करणाऱ्या जयसवालने इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर भारताने खेळलेल्या अखेरच्या कसोटी मालिकेमध्ये तब्बल 712 धावा केल्या होत्या. या कामगिरीच्या जोरावर त्याने आयसीसीच्या टॉप 10 कसोटी फलंदाजांमध्ये स्थान मिळवलं होतं. मात्र त्यानंतर जयसवालला सातत्य राखण्यात अपयश आलं. आयपीएल 2024 चं पर्वामध्ये शतक झळकवल्यानंतरही त्याला टी-20 वर्ल्ड कपमध्ये पूर्णवेळ संघाबाहेरच बसावं लागलं.
18 तारखेपासून चेन्नईमध्ये बांगलादेशविरुद्ध सुरु होत असलेल्या कसोटीपूर्वी सुरु असलेल्या सरावादरम्यान रविवारी जयसवालचा सराव बघून भारतीय संघाचं टेन्शन वाढलं आहे. कसोटीला दोन दिवस बाकी असतानाच जयसवालचा नेट्समधील खेळ पासून प्रशिक्षक गौतम गंभीरबरोबरच अगदी विराट कोहलीही त्याच्या मदतीसाठी पुढे सरसावल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे जसप्रीत बुमराहच्या एका कृतीनंतर हे दोघेही थेट मैदानात मदतीसाठी उतरल्याचं दिसून आलं.
'इंडियन एक्सप्रेस'ने दिलेल्या वृत्तानुसार, एम.ए. चिदम्बरम स्टेडिमवर कोहली त्याला फलंदाजीच्या सरावासाठी संधी मिळेल याची वाट पाहत उभा होता. त्यावेळेस नेट्समध्ये गोलंदाजी करणाऱ्या जसप्रीत बुमराहने जयसवालला क्लीन बोल्ड केलं. अर्थात बुमराह सारख्या जागतिक स्तरावरील अव्वल दर्जाच्या गोलंदाजाकडून बाद होणं काही चुकीचं नाही. यातून शिकायला मिळणार हे नक्की. मात्र ज्या पद्धतीने जयसवाल बाद झाला ते पाहून कोहली स्वत: त्याच्याकडे चालत गेला आणि त्याच्याशी चर्चा करु लागला. बुमराहने टाकलेला बॉल जयसवालच्या बॅट आणि पॅडमधील गॅपमधून थेट मिडल स्टम्पवर जाऊन आदळला.
बरं जयसवालला ही अडचण केवळ बुमराहविरुद्ध येत होती अशं नाही. आकाश दीपच्या गोलंदाजीवरही जयसवाल चाचपडला. आकाश दीपनेच मागील आठवड्यात दुलीप चषक स्पर्धेत जयसवालला चकवा दिला होता. जयसवाल या दोघांबरोबरच मोहम्मद शमीसमोरही चाचपडत होता. इतकच काय तर जम्मू-काश्मीरच्या युधवीर सिंह नावाच्या नवख्या गोलंदाजासमोरही जयसवालला फलंदाजी करता येत नव्हती.
जयसवालला येणारी अडचण पाहून कोहली स्वत: त्याच्या जवळ गेला आणि त्याला काही टीप्स दिल्या. अर्थात बुमराहकडून बाद झाल्यानंतर जयसवालला कोहलीने काही गोष्टी सांगितल्या. त्यानंतर स्वत: गौतम गंभीर जयसवालचा 20 मिनिटं फलंदाजीचा सराव घेताना दिसला.
भारतीय संघ आता बरेच कसोटी सामने खेळणार आहे. या वर्षाच्या शेवटी भारत ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. पॅट कमिन्स आणि नेथन लायन या दोघांनी जयसवालविरुद्ध गोलंदाजीसाठी उत्सुक असल्याचं यापूर्वीच सांगितलं आहे. इंग्लंडविरुद्ध जयसवालची फलंदाजी पाहून तो चांगलं आव्हान उभं करेल असं ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना वाटत आहे. जयसवालला फिरकी गोलंदाजांना खेळून काढण्यात काहीच अडचण नसली तरी तो वेगवान गोलंदाजांसमोर चाचपडतोय.