नवी दिल्ली : कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये यंदा भारताने आता बरीच मेडल्स जिंकली आहेत. यामध्ये आता महिला क्रिकेट टीम देखील मागे राहिलेली नाहीये. महिला क्रिकेटमध्ये पहिला सामना भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया असा रंगला होता. तर या दोन्ही टीम्सच्या सामन्याने ही स्पर्धा संपणार आहे. म्हणजेच फायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला एकमेंकींशी भिडणार आहेत.
भारतीय वेळेनुसार, रात्री साडेनऊ वाजता हा सामना सुरु होणार आहे. मुख्य म्हणजे दोन्ही टीम्सने मेडल पक्क केलं आहे. मात्र सुवर्णपदकावर कोणती टीम नाव कोरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
भारताने रोमहर्षक उपांत्य फेरीत इंग्लंडचा 4 रन्सने पराभव करून अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा 5 गडी राखून पराभव करत हे स्थान गाठलं. क्रिकेट स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्यपदकाचा निर्णय भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील लढतीने होणार आहे, तर कांस्यपदकाची लढत इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये होणार आहे.
कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात क्रिकेटचा पहिला सामना खेळला गेला. त्यामध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा 3 विकेट्स राखून पराभव केला. आता भारतीय महिला क्रिकेट टीमकडे अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवाची बरोबरी करण्याची मोठी संधी आहे.
भारतीय महिला क्रिकेट टीमचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा इतिहास पाहिला तर तो फारच वाईट आहे. T20 मध्ये खेळल्या गेलेल्या गेल्या 5 सामन्यांमध्ये भारतीय टीम 4 मध्ये पराभूत झाला आहे, तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. क्रिकेटच्या T20 फॉरमॅटमध्ये आतापर्यंत दोन्ही संघ एकूण 24 वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये भारतीय संघ केवळ 6 वेळा जिंकू शकला आहे. म्हणजेच 17 वेळा बाजी ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट टीमच्या नावावर आहे.