IND VS AUS 3rd Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून सध्या या सीरिजचा तिसरा सामना हा ब्रिस्बेन (गाबा) येथे खेळवला जात आहे. शनिवार 14 डिसेंबर पासून सुरु झालेल्या या सामन्यावर पावसाचे सावट आहे. त्याचा फटका हा तिसऱ्या दिवशीही बसला. सोमवारी भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना हा पावसाच्या अडथळ्यामुळे रखडला आणि अखेर थांबवण्यात आला. तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीपर्यंत ऑस्ट्रेलियाने 10 विकेट्स गमावून 445 धावा केल्या. तर टीम इंडियाला 4 विकेट्स गमावून दिवस अखेरीस फक्त 51 धावा करता आल्या. परिणामी टीम इंडियाच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
शनिवारी गाबा टेस्टला सुरुवात झाल्यावर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरावे लागले. शनिवारी पावसाच्या व्यत्ययामुळे 13 ओव्हरचाच सामना झाला. मात्र रविवारी पावसाने काहीवेळ विश्रांती घेतल्यामुळे सामना निर्विघ्न पार पडला. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी मैदानात जोरदार फटकेबाजी केली. तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाला 445 धावांवर ऑल आउट करण्यात टीम इंडियाला यश आले. ऑस्ट्रेलियाने उभा केलेला धावांचा डोंगर पार करण्यासाठी मैदानात उतरलेले भारतीय फलंदाज प्रत्येकी दोन अंकी धावा करण्यात अपयशी ठरले.
टीम इंडियाची ओपनिंग जोडी यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल मैदानात आले. यशस्वीला पुन्हा एकदा पहिल्या ओव्हरच्या दुसऱ्याच बॉलवर बाद झाला. तो केवळ एक चौकार ठोकून आल्या पावलीच माघारी परतला. तर त्यापाठोपाठ तिसऱ्या ओव्हरला शुभमन गिल देखील फक्त १ धाव करून माघारी परतला. तर त्यानंतर विराट कोहली (3) आणि ऋषभ पंतने (9) देखील स्वस्तात विकेट गमावली. त्यानंतर केएल राहुलची (नाबाद 33) साथ देण्यासाठी रोहित शर्मा मैदानात आला. परंतु पावसाचे आगमन झाल्यामुळे सामना थांबवण्यात आला. काही वेळाने पाऊस थांबला देखील परंतु सामना सुरु करण्यासाठी योग्य परिस्थिती नसल्याने तिसऱ्या दिवसाचा खेळ अधिकृतपणे थांबवण्याचा निर्णय अंपायरकडून घेण्यात आला. दिवस अखेरीस ऑस्ट्रेलिया 394 धावांनी आघाडीवर आहे.
ब्रिस्बेनमध्ये पुढील 5 दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. जर उर्वरित चौथ्या आणि पाचव्या दिवशी देखील पावसामुळे सामन्यात अडचणी आल्यास ब्रिस्बेन टेस्ट ड्रॉ होऊ शकते. सध्या WTC पॉईंट्स टेबलमध्ये दक्षिण आफ्रिका प्रथम क्रमांकावर असून त्यांची विजयाची टक्केवारी ही 63.33 इतकी आहे. तर ऑस्ट्रेलिया टेबलमध्ये दुसरा तर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताच्या खालोखाल श्रीलंका 45.45 विजयी टक्केवारीने चौथ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे या चार संघांमध्ये WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी शर्यत आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा टेस्ट सामना ड्रॉ झाला तर पॉईंट्स टेबलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियाचे दोन पॉईंट्स कमी होतील. पण WTC पॉईंट्स टेबलमध्ये कोणतेही बदल होणार नाहीत. तिसरा सामना ड्रॉ झाला तर ऑस्ट्रेलियाचे पॉईंट्स 60.71 ने कमी होऊन 58.89 होतील. तर भारताचे पॉईंट्स 57.29 ने कमी होऊन 55.88 होतील. पण दोन्ही संघांच्या रँकिंगमध्ये बदल होणार नाहीत. दक्षिण आफ्रिका पहिल्या तर श्रीलंका चौथ्या क्रमांकावर कायम राहतील. न्यूझीलंड 45.24 टक्क्यांनी पाचव्या स्थानावर आहे. मात्र ते अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. तिसऱ्या टेस्टमध्ये न्यूझीलंडने इंग्लंडला पराभूत केले तरीही ते केवळ 48. 21 टक्के गुण मिळवू शकतील, जे WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी पुरेसे ठरणार नाहीत.
यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकिपर), रोहित शर्मा (कर्णधार), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप.
उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवूड.