Super Sunday... भारत-पाकिस्तान Finals मध्ये भिडणार! पाहा कधी, कुठे कसा पाहता येईल हा सामना

IND vs PAK Match Timings: यापूर्वीही या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचा संघ आमने-सामने आला आहे. या स्पर्धेमध्ये भारताने एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळेच आजच्या सामन्याचा निकाल काय लागणार आणि हा चषक कोण जिंकणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 23, 2023, 08:12 AM IST
Super Sunday... भारत-पाकिस्तान Finals मध्ये भिडणार! पाहा कधी, कुठे कसा पाहता येईल हा सामना title=
या आधीही या स्पर्धेत आमने-सामने आलेत दोन्ही संघ

IND A vs PAK A Emerging Asia Cup: श्रीलंकेमध्ये सुरु असलेल्या इमर्जिंग आशिया चषक (Emerging Asia Cup) स्पर्धेचा अंतिम सामना आज म्हणजेच 23 जुलै रोजी खेळवला जाणार आहे. विशेष म्हणजे हा सामना भारत आणि पाकिस्तानदरम्यान (India vs Pakistan) खेळवण्यात येणार असल्याने आजचा सण्डे हा सुपर सण्डे ठरणार आहे. भारत अ विरुद्ध पाकिस्तान अ संघ (IND A vs PAK A) कोलंबोमधील (Columbo) आर. प्रेमदासा स्टेडियमवर (R. Premadasa International Cricket Stadium) खेळवला जाणार आहे. भारताने उपांत्यफेरीमध्ये बांगलादेशला (Bangladesh) पराभूत करत अंतिम सामन्यात धडक मारली तर दुसरीकडे पाकिस्तानने यजमान श्रीलंका अ (Sri Lanka A) संघाला पराभूत करत अंतिम सामना गाठला. भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा या मालिकेतील हा दुसरा सामना असणार आहे. साखळी फेरीमध्ये भारताने पाकिस्तानला पराभूत केलं आहे.

भारताची कामगिरी कशी?

इमर्जिंग आशिया चषक स्पर्धेमध्ये भारत अ संघाने दमदार कामगिरी केली आहे. भारतीय संघाने या मालिकेतील एकही सामना गमावलेला नाही. भारताने युनायटेड अरब अमिराती म्हणजेच यूएईला 8 गडी राखून पराभूत केलं. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने नेपाळच्या संघाला 9 गडी राखून पराभूत केलं. साखळी फेरीतील अंतिम सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानला 8 गडी राखून पराभत केलं होतं. उपांत्यफेरीत भारताने बांगलादेशला 51 धावांनी पराभूत करत अंतिम सामन्यात प्रवेश केला. भारताने 4 पैकी 3 सामने धावांचा पाठलाग करताना जिंकलेत तर एक सामना पाहिल्यांदा फलंदाजी करताना जिंकला आहे.

पाकिस्तानची कामगिरी कशी?

पाकिस्तानची या स्पर्धेमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी 4 पैकी 3 सामने जिंकले आहेत. पाकिस्तानने पहिल्या सामन्यात नेपाळला 4 गडी राखून पराभूत केलं. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने युएईला 184 धावांनी पराभूत केलं. तिसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत केलं. उपांत्यफेरीत पाकिस्तानने यजमान संघाला 60 धावांनी पराभूत केलं.

कोणाची बाजू सरस

या स्पर्धेमधील भारताची कामगिरी पाहता ही स्पर्धा भारतीय संघच जिंकेल असं मानलं जात आहे. पाकिस्तानचा संघ इतर आशियाई संघांसमोर दमदार वाटत असला तर भारतीय संघाच्या गोलंदाजी आणि फलंदाजीसमोर ते फिके पडत असल्याचं चित्र यापूर्वीच्या सामन्यात पाहायला मिळालं आहे.

कधी सुरु होणार सामना? कुठे लाइव्ह पाहता येणार?

आज या स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तानमध्ये खेळवला जाणार असून दुपारी 2 वाजल्यापासून हा सामना सुरु होणार आहे. हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाइव्ह पाहता येणार आहे. ऑनलाइन माध्यमातून हा सामना फॅनकोडवर पाहता येणार आहे.