वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी मोठी घडामोड, भारताचा 'हा' दिग्गज खेळाडू अफगाणिस्तानच्या संघात सामील

ICC World Cup 2023: येत्या पाच तारखेपासून आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होतेय. या स्पर्धेपूर्वी एक मोठी घडामोड समोर आली आहे. भारताचा दिगग्ज खेळाडू अफगाणिस्तानच्या संघात दाखल झाला आहे. 

राजीव कासले | Updated: Oct 2, 2023, 07:35 PM IST
वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी मोठी घडामोड, भारताचा 'हा' दिग्गज खेळाडू अफगाणिस्तानच्या संघात सामील title=

ICC World Cup 2023 2023 : आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला आता अवघ्या दोन दिवसांचा अवधी उरलाय. येत्या पाच ऑक्टोबरपासून विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होईल. त्या आधी एक मोठी घडामोड घडली आहे. भारताचा दिग्गज खेळाडू अफगाणिस्तानच्या (Afghanistan) संघात दाखल झाला आहे. स्पर्धा अवघ्या दोन दिवसांवर आली असताना या घडामोडीने संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष वेधलं आहे.

हा खेळाडू अफगाणिस्तान संघात
भारताचा माजी दिग्गज खेळाडू अजय जडेजाला (Ajay Jadeja) अफगाणिस्तान संघाने मेंटॉर (Mentor) म्हणुन नियुक्त केलं आहे. जडेजा भारतासाठी तब्बल 196 एकदिवसीय सामने खेळला आहे. यातल्या 13 एकदिवसीय सामन्यात त्याने कर्णधारपदही सांभाळलं आहे. अजय जडेजा भारतासाठी तीन वर्ल्ड कपही खेळला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये अजय जडेजाने तीन शतकं आणि 30 अर्धशतकं केली आहेत. त्याच्या खात्यात 5339 धावा जमा आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये अजय जडेजाचा टॉप टेनमध्ये समावेश होतो. 

अजय जडेजाची क्रिकेट कारकिर्द
अजय जडेजाने भारतासाठी अनेक विक्रमी खेळी केल्या आहेत. 1996 क्रिकेट विश्वचषकाच्या क्वार्टर फायनलमध्ये जडेजाने पाकिस्तानविरुद्ध् अवघ्या 25 चेंडूत 45 धावा केल्या होत्या. पाकचा वेगवान गोलंदाज वकार युनिसच्या दोन षटकात त्याने 40 धावा ठोकल्या होत्या. या खेळीचं खूप कौतुक झालं होतं. 1992 ते 2000 दरम्यान अजय जडेजा भारतासाठी 15 कसोटी सामनेही खेळला आहे. यात त्याने 26.18 च्या स्ट्राईक रेटने 576 धावा केल्या आहेत. 96 ही त्याची कसोटीतली सर्वोच्च धावसंख्या असून चार अर्धशतकं त्याच्या नावावर आहेत. 

मॅच फिक्सिंगचा आरोप
अजय जडेजाच्या क्रिकेट कारकिर्दीला मॅच फिक्सिंगचं ग्रहण लागलं आणि त्याच्या क्रिकेट कारकिर्दिला पूर्णविराम लागला. 2 हजार साली भारतीय संघाच्या मोहम्मद अझरुद्दीन आणि अजय जडेजावर मॅच फिक्सिंगचा आरोप करण्यात आला. त्यानंतर बीसीसीआयने अझरुद्दीवर आजीवन बंदीची कारवाई केली. तर जडेजावर पाच वर्षांची बंदी घातली. बंदीचा कालावधी संपल्यानेतर जडेजाने आंतरराष्ट्रायी क्रिकेटमध्ये खेळण्याची परवानगी मागणारी याचिका कोर्टात केली. पण ती फेटळण्यात आली. त्यानंतर जडेजा रणजी क्रिकेटमध्ये परतला. तो दिल्ली संघाकडून काही सामने खेळला. त्यानंतर 2015-16 मध्ये तो दिल्लीचा मुख्य प्रशिक्षकही बनला.

विश्वचषकासाठी अफगाणिस्तानचा संघ
हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम जादरान, रियाज हसन, रहमत शाह, नजीबुल्लाह जादरान, मोहम्मद नबी, इकराम अलीखिल, अजमतुल्ला उमरजई, राशिद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फारूकी, अब्दुल रहमान, नवीन उल हक.