लाहोर : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियांदादने पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओकली आहे. भारत हा असुरक्षित असल्यामुळे आयसीसीने परदेशी टीमना भारतात जाण्यापासून रोखावं, असं वक्तव्य जावेद मियांदादने केलं आहे. भारतातली लोकं सध्या एकमेकांविरुद्ध लढत आहेत, त्यामुळे भारत हा परदेशी टीमना खेळण्यासाठी सुरक्षित नाही. त्यामुळे आयसीसीने इतर देशांच्या टीमना भारतात पाठवू नये, असं मियांदाद म्हणाला.
आयसीसीकडून आता आम्हाला न्याय मिळतो का हे पाहायचं आहे. आयसीसी आता काय करणार आणि जगाला काय सांगणार? असे प्रश्नही मियांदादने विचारले आहेत.
नागरिकत्व सुधारणा विधेयकावरुन सुरु असलेल्या हिंसक आंदोलनाचा दाखला देताना मियांदादने हे वक्तव्य केलं आहे. श्रीलंकेच्या टीमवर २००९ साली दहशतवादी हल्ला झाल्यानंतर १० वर्ष पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलं गेलं नाही. अखेर २०१९ साली श्रीलंकेचीच टीम पुन्हा पाकिस्तानमध्ये गेली. वनडे आणि टेस्ट सीरिजमध्ये पाकिस्तानचा विजय झाला, तर टी-२० सीरिज श्रीलंकेने ३-० अशी जिंकली.
याआधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एहसान मणी यांनीही भारताबाबत मुक्ताफळं उधळली होती. भारतातली सुरक्षा पाकिस्तानच्या सुरक्षेपेक्षा जास्त खराब असल्याचं वक्तव्य पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एहसान मणी यांनी केलं होतं. यावरून बीसीसीआय आणि पीसीबीमध्ये वाद झाले होते. बीसीसीआयनेही एहसान मणींच्या या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिलं होतं.
एहसान मणी यांनी पहिले स्वत:च्या देशातल्या सुरक्षेवर लक्ष द्यावं. आम्ही आमच्या देश सुरक्षित ठेवण्यासाठी सक्षम आहोत, अशी प्रतिक्रिया बीसीसीआयचे उपाध्यक्ष माहिम वर्मा यांनी दिली.
बहुतेक काळ इंग्लंडमध्ये राहणाऱ्या एहसान मणींनी भारतातल्या सुरक्षेविषयी बोलणं अयोग्य आहे. भारतच काय पाकिस्तानच्या सुरक्षेविषयी बोलायलाही एहसान मणी पात्र नाहीत. एहसान मणी पाकिस्तानमध्ये जास्त काळ थांबले, तर त्यांना तिकडची खरी परिस्थिती कळेल, अशी टीका बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमळ यांनी केली.