ICC ODI Ranking : आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला आणि तिसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरण्याचं स्वप्न भंगलं. पण संपूर्ण स्पर्धेत टीम इंडियाने (Team India) दमदार कामगिरी केली. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियाने सलग 10 सामने जिंकले. विशेष म्हणजे टीम इंडिया कोणत्याही एका खेळाडूवर अवलंबून नव्हती. टीम इंडियातल्या प्रत्येक खेळाडूने दमदार कामगिरी केली. याचाच फायदा टीम इंडियाच्या खेळाडूंना आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत (ICC ODI Ranking) झाली आहे. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आयसीस क्रमवारी मोठी झेप घेतली आहे.
कोहलीची 'विराट' झेप
विश्वचषक स्पर्धेत विराट कोहलीच्या बॅटमधून खोऱ्याने धावा निघाल्या. या स्पर्धेत विराटने सर्वाधिक 765 धावा केल्या, याच कामगिरीच्या जोरावर विराटला प्लेअर ऑफ द टूर्नांमेंटचा खिताबही देण्यात आला. विश्वचषक स्पर्धेतील दमदार कामगिरीनंतर कोहलीने आयसीसी एकदिवसीय क्रमवारीतही विराट झेप घेतली आहे. आयसीसीच्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीत विराट कोहली थेट तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. विराटच्या खात्यात 791 पॉईंट जमा झालेत. याआधी विराट 770 पॉईंटसह चोथ्या क्रमांकावर होता.
गिल-बाबरला विराटचा धोका
आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत असलेल्या शुभमन गिलपासून विराट कोहली आता फक्त 35 पॉईंट दूर आहे. गिलच्या खात्यात 826 रेटिंग पॉईंट्स आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तनचा माजी कर्णधार बाबर आझम आहे. बाबर आझमच्या खात्यात 824 रेटिंग पॉईंट आहेत. त्यामुळे येणाऱ्या काही सामन्यात विराट कोहलीपासून शुभमन गिल आणि बाबर आझमला धोका आहे.
2021 मध्ये नंबर वन
विराट कोहलीच्या नावावर तब्बल चार वर्ष आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानावर राहाण्याचा विक्रम आहे. 2007 ते 2021 अशी चार वर्ष म्हणजे तब्बल 1258 दिवस विराट नंबर वनवर होता. पण 2021 मध्ये विराट कोहलीचा फॉर्म बिघडला. इतकच काय तर विराट टॉप 10च्या बाहेर फेकला गेला. पण आता विराट कोहली पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आलाय. विश्वचषकात तीन शतकं त्याच्या नावावर असून एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने तब्बल 50 शतकं पूर्ण करत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक शतकांचा विक्रम मागे टाकलाय.
केवळ विराट कोहलीच नाही तर रोहित शर्माही आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत चौथ्या स्थानावर पोहोचलाय. याआधी कर्णधार रोहित शर्मा 739 पॉईंटसह सहाव्या क्रमांकावर होता.
गोलंदाजही चमकले
आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दमदार प्रदर्श केलंय. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज तिसऱ्या तर जसप्रीत बुमराह चौथ्या स्थानावर आहे. चायनामन गोलंदाज कुलदीप यादव सातव्या स्थानावर आहे. तर विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा मोहम्मद शमीने दहाव्या स्थानावर झेप घेतली आहे.