T20 World Cup 2024 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा संपलीय. अंतिम सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. पण या पराभवामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. काही महिन्यातच म्हणजे 2024 मध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषक (T20 World Cup 2024) स्पर्धेत रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) खेळणार का? बीसीसीआय (BCCI) या दोन दिग्गजांच्या बाबतीत काय भूमिका घेणार? टी20 संघाची धुरा हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आली आहे. तसंच संघात युवा खेळाडूंचा जास्त भरणा आहे. अशात रोहित आणि विराटला संधी मिळणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत.
टी20 सामन्यातील कामगिरी
रोहित शर्मा आता 36 वर्षांचा आहे. तर विराट कोहलीचं वय 35 आहे. पण या दोघांचा फिटनेस अजूनही युवा क्रिकेटपटूंना लाजवेल असा आहे. टी20 क्रिकेटमध्ये या दोघांची कामगिरी जबरदस्त आहे. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहली सर्वात जास्त धावा करणार फलंदाज आहे. विराटने 107 इनिंग्समध्ये 4008 धावा केल्या आहे. 122 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.
रोहित शर्माच्या कामगिरीवर नजर टाकली तर विराटनंतर तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माने 140 सामन्यात तब्बल 4 शतक लगावली आहेत आणि त्याच्या खात्यात 3853 धावा जमा आहेत. त्याचा स्ट्राईक रेट 139.24 इतका तगडा आहे. आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळण्याचा अनुबव दोघांकडे जास्त आहे. त्यामुळे त्यांचा अनुभव आणि आक्रमक फलंदाजी टी20 विश्वचषकात टीम इंडियासाठी जमेची बाजू ठरणार आहे.
टी20 विश्वचषकात दमदार कामगिरी
विराट कोहली 2012 पासून आतापर्यंत टी20 विश्वचषकात 27 सामने खेळला आहे. यात त्याने 14 अर्धशतकांसह तब्बल 1127 धावा केल्या आहेत. 89 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या असून 131.30 स्ट्राईक रेट आहे. 2014 टी20 विश्वचषकात 319, 2016 टी20 विश्वचषकात 273 आणि 2022 टी20 विश्वचषकात 296 धावा त्याच्या नावावर आहेत.
तर रोहित शर्मा 2007 ते 2022 दरम्यान टी20 विश्वचषकात तब्बल 39 सामने खेळलाय. यात त्याने 9 अर्धशतकांसह 693 धावा केल्या आहेत. टी20 विश्वचषकात रोहितची सर्वोत्तम धावसंख्या 79 इतकी आहे. तर त्याचा स्ट्राईक रेट 128 आहे.
रोहित-विराटने टी20 क्रिकेट खेळावं?
रोहित आणि विराटची आकडेवारी पाहिली तर टी20 विश्वचषक 2024 मध्ये त्यांनी खेळावं असं अनेकांना वाटतंय. भारताचा दिग्गज क्रिकेटपटू दिनेश कार्तिकनेही दोघांच्या खेळण्याची शक्यता वर्तवली आहे. आता बीसीसीआय याबाबत काय भूमिका घेणार याकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलं आहे.