'त्यावेळी तर इतका वाद झाला होता की...', अश्विन विरुद्ध शार्दूल प्रकरणी हरभजन सिंगचा मोठा खुलासा

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने आर अश्विन विरुद्ध शार्दूल ठाकूर वादात आपलं मत मांडलं असून, वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपदरम्यान झालेल्या चर्चेचा खुलासा केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Dec 26, 2023, 01:42 PM IST
'त्यावेळी तर इतका वाद झाला होता की...', अश्विन विरुद्ध शार्दूल प्रकरणी हरभजन सिंगचा मोठा खुलासा title=

भारतीय क्रिकेट संघ जेव्हा दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाचा दौरा करतं तेव्हा नेहमीच सोशल मीडियावर भारताने दोन फिरकीपटूंचा पर्याय पडताळून पाहावा का याची चर्चा रंगते. सध्या भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असून पुन्हा एकदा हा विषय चर्चेत आला आहे. रवीचंद्रन अश्विन की शार्दूल ठाकूर, यापैकी कोणाला संधी द्यावी याबाबत मतं मांडली जात असताना भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंगनेही मत व्यक्त केलं आहे. यावेळी त्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपसाठी झालेल्या निवडीची आठवणही करुन दिली. हरभजनच्या मते शार्दुल ठाकूरला वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपसाठी संधी देण्यात आली असताना, बॉक्सिंग डे टेस्टसाठी आर अश्विनचा विचार केला जावा. 

"शार्दुल ठाकूर की आर अश्विन यांच्यापैकी कोणाला संधी द्यावी याबद्दल मोठी चर्चा सुरु आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपदरम्यान यावर फारच रंगतदार चर्चा झाली होती. तिथे परिस्थिती वेगळी असल्याने पहिल्या दिवशी चेंडू फिरतो. त्यामुळे तिथे शार्दूल ठाकूरची निवड करणं मला योग्य वाटलं होतं. मैदानात फर गवत असल्याने तो फार प्रभाव पाडू शकला नाही. पण तरीही त्याची निवड योग्य असल्याचं मला वाटलं होतं," असं हरभजन सिंगने आपल्या युट्यूब चॅनेलवरील व्हिडीओत म्हटलं.

दरम्यान बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात तेथील हवामान पाहता शार्दूल ठाकूरच्या जागी आऱ अश्विनला संधी देणं जास्त योग्य ठरेल असं मत हरभजन सिंगने व्यक्त केलं आहे. "येथे परिस्थिती वेगळी आहे. उष्ण वातावरण असल्याने खेळपट्टी टणक असेल. त्यामुळे चेंडूला उसळी मिळेल. तुमच्याकडे 3 जलदगती गोलंदाज असताना, 2 फिरकी गोलंदाजांना संधी देण्यात हरकत नाही. मला वाटतं दक्षिण आफ्रिकेला जलदगती गोलंदाजांचा सामना करण्यास आवडेल. त्यामुळे आपण आपली जमेची बाजू वापरली पाहिजे. मला वाटतं अश्विनला संधी दिली जावी. पण तसं होताना दिसत नाही आहे," असं हरभजन सिंग म्हणाला आहे.

हरभजन सिंगने यावेळी इतर खेळाडूंच्या निवडीवरही भाष्य केलं. हरभजनने रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांना सलामीला पाठवल्या जाण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. तर शुभमन गिलला तिसऱ्या क्रमांकावर पाठवणंही योग्य असल्याचं सांगितलं. 

"माझ्या मते रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल सलामीला उतरतील. शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर खेळेल आणि चौथा क्रमांक विराट कोहलीसाठी असेल. पाचवा आणि सहावा क्रमांक श्रेयस अय्यर आणि के एल राहुल यांच्यासाठी आहे. सातव्या क्रमांकासाठी रवींद्र जाडेजा आहे. पण आठव्या क्रमांकावर कोण खेळणार हा मोठा प्रश्न आहे. तिथे अश्विन आणि शार्दूल दोघेही आहेत. मला वाटतं अश्विनने 8 व्या क्रमांकावर खेळावं. कारण जसप्रीत बुमराह नवव्या, सिराज दहाव्या आणि प्रसिद्ध कृष्णा 11 व्या क्रमांकावरआहेत", असं हरभजन सिंगने सांगितलं.