Champions Trophy 2025 : पाकिस्तानात पुढच्या वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. मात्र या स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानला जाणार की नाही याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात होते. परंतु अद्याप टीम इंडियाला (Team India) पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाठवण्याबाबत भारत सरकारने परवानगी दिलेली नाही, त्यामुळे आता पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि आयसीसीची डोकेदुखी वाढली आहे.
भारत सरकारची भूमिका लक्षात घेऊन आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आता चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रीड मॉडल पद्धतीने खेळवण्यासाठी तयार झाली आहे. हा खुलासा पीसीबीच्या रिपोर्टमध्ये करण्यात आलेला असून यात दिलेल्या माहितीनुसार भारत आपले सर्व सामने हे यूएईमध्ये खेळेल.
पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी संदर्भात सर्वात मोठा हा मुद्दा हा सुरक्षेसंदर्भातला आहे. हेच कारण आहे ज्यामुळे भारत सरकार टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात पाठवू इच्छित नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या सूत्रांनी सांगितले की, भारत सरकार त्यांच्या क्रिकेट टीमला पाकिस्तानात येऊन खेळण्याची परवानगी देत नसेल तर चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रीड मॉडल पद्धतीने खेळवण्यात येईल. अशावेळी भारताचे सामने हे दुबई किंवा शारजाह येथे खेळवले जातील. सूत्रांनी म्हंटले की, 'पीसीबीला हवंय कि बीसीसीआयने हे लिखित स्वरूपात द्यावं की भारत सरकार त्यांना पाकिस्तानात खेळण्याची परवानगी देत नाही'. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी मीडिया कडून सांगितले जात होते की 2025 मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक 11 नोव्हेंबर पर्यंत जाहीर होईल.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पुढील वर्षी फेब्रुवारी आणि मार्च दरम्यान खेळली जाईल. रिपोर्टनुसार या स्पर्धेला 19 फेब्रुवारी पासून सुरुवात होईल. तर या स्पर्धेचा फायनल सामना हा 9 मार्च रोजी खेळाला जाऊ शकतो. पाकिस्तानी मीडिया द एवसप्रेस ट्रिब्यूननुसार आयसीसीचे एक प्रतिनिधि मंडळ 10 ते 12 नोव्हेंबर पर्यंत लाहोरमध्ये पोहोचेल आणि पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीची तयारी कशी सुरु आहे याचे निरीक्षण करेल. 2025 मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक 11 नोव्हेंबर पर्यंत जाहीर होऊ शकते.
रिपोर्टनुसार ग्रुप ए मध्ये भारत आणि पाकिस्तान सह न्यूझीलंड आणि बांगलादेश यांचा समावेश असेल. तर बी ग्रुपमध्ये इंग्लंड, साउथ अफ्रीका, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांचा समावेश असेल. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ही स्पर्धा 19 फेब्रुवारी ते 9 मार्च पर्यंत खेळवली जाईल. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 8 संघांमध्ये एकूण 15 सामने होतील. हे सर्व सामने लाहोर, कराची आणि रावळपिंडी या तीन ठिकाणी खेळवले जातील.