फिरसे टूटा है गाबा का घमंड! नव्या कोऱ्या विंडीजने कांगारुंना पाजलं पाणी; रोमांचक सामन्यात विजय

आॅस्ट्रेलिया विरूद्ध वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सिरीज सिरीज सुरु असून दुसऱ्या आणि महत्त्वाच्या गाबा टेस्टमध्ये वेस्ट इंडिजने आॅस्ट्रेलियाचा पराभव केला आहे.

सुरभि जगदीश | Updated: Jan 28, 2024, 01:34 PM IST
फिरसे टूटा है गाबा का घमंड! नव्या कोऱ्या विंडीजने कांगारुंना पाजलं पाणी; रोमांचक सामन्यात विजय title=

 Aus vs Wi: आॅस्ट्रेलिया विरूद्ध वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सिरीज सिरीज सुरु असून दुसऱ्या आणि महत्त्वाच्या गाबा टेस्टमध्ये वेस्ट इंडिजने आॅस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. आॅस्ट्रेलियासाठी सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या गाबाच्या मैदानावर विश्वविजेत्या पराभव होणं ही कांगारूंसाठी फार लज्जास्पद बाब मानली जातेय. वेस्ट इंडिजने अवघ्या ८ रन्सने हा सामना जिंकला. मुख्य म्हणजे तब्बल २७ वर्षांनंतर वेस्ट इंडिजच्या टीमने आॅस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. या विजयासह वेस्ट इंडिजने सिरीजमघ्ये १-१ अशी बरोबरी देखील साधली आहे.

२४ वर्षीय खेळाडू ठरला हिरो

दुसऱ्या टेस्ट सामन्याचा खरा हिरो ठरला तो वेस्ट इंडिजचा गोलंदाज शमर जोसेफ. जोसेफने त्याच्या गोलंदाजीने कांगारू फलंदाजांची चांगलीच दाणादाण उडवली. आॅस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात जोसेफने ७ विकेट्स घेतल्या. दुखापत ग्रस्त असतानाही जोसेफ मैदानात उतरला आणि वेस्ट इंडिजसाठी मोठा इतिहास रचला.

वेस्ट इंडिजच्या फलंदाजीदरम्यान मिचेल स्टार्कच्या यॉर्करवर जोसेफ जखमी झाला होता. यावेळी जोसेफच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्याला मैदानाबाहेर जावं लागलं आणि फलंदाजीही करता आली नाही. मात्र यानंतर आॅस्ट्रेलियाने लक्ष्याचा पाठलाग करण्यास सुरुवात केली तेव्हा शामर जोसेफने मैदानात येऊन गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 24 वर्षीय शामर जोसेफ दुखापतीनंतरही मैदानात परतला आणि त्याने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना गुडघे टेकण्यास भाग पाडलं. जोसेफने ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात 7 विकेट्स घेत वेस्ट इंडिजला 8 रन्सने विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

दुसऱ्या टेस्ट सामन्याच्या पहिल्या डावात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 311 रन्स केले होते. पहिल्या डावात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 9 गडी गमावून 289 धावा केल्या होत्या. आता वेस्ट इंडिजला ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोठ्या धावसंख्येचे लक्ष्य करण्याची संधी होती. मात्र वेस्ट इंडिजला दुसऱ्या डावात केवळ 193 रन्स करणं शक्य झालं. यावेळी एकाही खेळाडूला अर्धशतकही करता आले नाही.

यानंतर ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 216 रन्सची गरज होती. मात्र कागांरूंची संपूर्ण टीम 207 रन्सवर गडगडली. पहिल्या डावात फ्लॉप ठरलेल्या स्टीव्ह स्मिथने एका टोकाला वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा एकहाती सामना केला. मात्र त्याला टीमला विजय मिळवून देता आला नाही. त्याची 91 रन्सची नाबाद खेळी व्यर्थ गठरली. 

दुसरीकडे कॅमेरून ग्रीननेही 73 बाॅल्समध्ये 42 रन्सची चांगली खेळी केली. उस्मान ख्वाजा 10 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मार्नस लॅबुशेन 5 आणि ट्रॅव्हिस हेड 0 धावांवर बाद झाले.