'मी आजपर्यंत कधीच सांगितलेलं नाही, पण...', श्रीसंतने केला धोनीबद्दलचा खुलासा

भारतीय क्रिकेट संघाचा माजी जलदगती गोलंदाज श्रीसंथने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीबद्दल एक खुलासा केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Sep 29, 2023, 12:41 PM IST
'मी आजपर्यंत कधीच सांगितलेलं नाही, पण...', श्रीसंतने केला धोनीबद्दलचा खुलासा title=

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात ज्या महान खेळाडूंची नावं कायम घेतली जातील त्यातील एक नाव महेंद्रसिंग धोनीचं आहे. आपल्या कारकिर्दीत महेंदसिंग धोनीने अशी कामगिरी केली आहे, जी पुढील अनेक दशकं लक्षात ठेवली जाईल. भारतीय संघाचं नेतृत्व करताना महेंद्रसिंग धोनीने एक वेगळी उंची गाठली होती. धोनीच्याच नेतृत्वात भारताने वर्ल्डकप जिंकला असल्याने त्याची गणना एका महान खेळाडूत होते. त्यात धोनीचं साधं राहणीमान यामुळे त्याचे फक्त भारतच नाही तर जगभरात चाहते आहेत. धोनीबद्दलचे अनेक असे किस्से आहेत ज्यांची सोशल मीडियावर चर्चा होत आहेत. यादरम्यान आता भारतीय क्रिकेट संघाचा माजी जलदगती गोलंदाज श्रीसंतने धोनीबद्दलचा एक खुलासा केला आहे. हा किस्सा केरळमध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यानचा आहे. चाहते मैदानात सचिन, सचिन अशा घोषणा देत असताना धोनीला आता आपणही चांगली कामगिरी करत संघात स्थान मिळवण्याची वेळ आली आहे, याची जाणीव झाली होती. 

"केरळमधील भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी त्यावेळचे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक जॉन राइट यांनी मला नेटमध्ये गोलंदाजी करण्यासाठी बोलावलं होतं. कोचीमध्ये हा सामना होणार होता. भारत-पाकिस्तान सामना असल्याने मैदान खचाखच भरलं होतं. प्रत्येकजण 'इंडिया, इंडिया, सचिन, सचिन' असं ओरडत होतं", अशी माहिती श्रीसंतने Sportskeeda शी बोलताना दिली. 

"धोनी आला आणि तो आम्ही खेळाडूंशी (सपोर्ट खेळाडू) बोलू लागला. मी हे आजपर्यंत कुठेही सांगितलेलं नाही. आम्ही जेव्हा तिथे उभे होतो तेव्हा धोनीने म्हटलं की, मला व्यक्त व्हायचं आहे. मला कुठेही व्यक्त होण्याची संधी मिळत नाही आहे," असं श्रीसंतने सांगितलं. महेंद्रसिंग धोनीला स्वत:ला सिद्ध करायचं होतं. तर दुसरीकडे श्रीसंतला भविष्यात भारतासाठी खेळण्याची इच्छा होती. 

"त्यावेळी केरळमधील आणखी एक खेळाडू माझ्यासह होता. धोनी आमच्याशी बोलत होता. आम्ही त्यावेळी धोनीला मस्करीत म्हणालो की, धोनी भाई आम्हालाही पुढील 1 ते 2 वर्षात भारतासाठी खेळायचं आहे. त्यावेळी धोनी हसला आणि म्हणाला, हो नक्कीच. फक्त तुम्ही मेहनत घेत राहा," असं श्रीसंतने म्हटलं.

"डिनर पार्टीत आमच्यात सामान्य चर्चा झाली. मी त्यावेळी धोनीला सांगितलं की, चिंता करुन नकोस. तू लवकरच भारतासाठी खेळशील आणि चांगली कामगिरी करशील. बेंचवर बसलेल्या खेळाडूंचं मनोबल वाढवण्याची मला सवय आहे. तुमचा विश्वास बसणार नाही, पण पुढील सामन्यात त्याने शतक ठोकलं. दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात, त्याला संधी मिळाली आणि त्याने शतक ठोकलं," असा खुलासा श्रीसंतने केला.

यानंतर धोनीने भारत अ साठी खेळतानाही शतक ठोकलं. यानंतर मात्र त्याने मागे वळून पाहिलं नाही आणि भारतीय संघाचा महान खेळाडू झाला. "महेंद्रसिंग धोनीला 'भारत अ' संघात संधील मिळाली आणि त्याने शतक ठोकलं. त्यानंतर पुन्हा एकदा शतक केलं. कसला जबरदस्त प्रवास आहे. 2003-04 मध्ये दुलीप ट्रॉफीत खेळण्यापासून ते दोन वर्ल्डकप जिंकेपर्यंत, कसला अविश्वसनीय प्रवास आहे. म्हणूनच म्हणतात तुम्ही फक्त आशा करु नका, तर विश्वास ठेवा," असं श्रीसंत म्हणाला आहे.

"मी माझ्या आत्मचरित्रातही हे लिहिणार आहे. भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान धोनीने मला सांगितलं की, मला माहिती नाही नेमकं काय करायचं आहे. तुम्ही येथे का आले आहात हे माहिती नाही, पण काय करायचं आहे हे माहिती आहे," असा खुलासा श्रीसंतने केला आहे.