CWG 2022 : कुस्तीमध्ये भारताची सुवर्ण कामगिरी,रवी दहियानंतर विनेश फोगटने जिंकले सुवर्णपदक

भारताने 11 सुवर्ण, 11 रौप्य आणि 11 कांस्य पदकांसह एकूण 33 पदके जिंकली आहेत

Updated: Aug 6, 2022, 11:13 PM IST
CWG 2022 : कुस्तीमध्ये भारताची सुवर्ण कामगिरी,रवी दहियानंतर विनेश फोगटने जिंकले सुवर्णपदक title=

Commonwealth Games 2022: बर्मिंगहॅम येथील कॉमनवेल्थ खेळांमध्ये भारताने 11 सुवर्ण, 11 रौप्य आणि 11 कांस्य पदकांसह एकूण 33 पदके जिंकली आहेत. खेळांच्या नवव्या दिवशी भारतीय खेळाडूंच्या संख्येत 7 पदकांची वाढ झाली आहे. 

रवी कुमार  दहियाने शनिवारी कुस्तीत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. त्यानंतर लगेचच विनेश फोगटनेही कुस्तीमध्ये भारताला पाचवे सुवर्णपदक मिळवून दिले आहे.

रवी कुमार दहिया याने अंतिम फेरीत, त्याने त्याचा नायजेरियन प्रतिस्पर्धी अबिकवेनिमो वेल्सेनवर 10-0 अशी मात केली. 57 किलो वजनी गटात रवी उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत होता. तत्पूर्वी, त्याने न्यूझीलंडच्या आणि पाकिस्तानच्या खेळाडूंचा पराभव केला होता.

दरम्यान, भारताला कुस्तीमध्ये आणखी एक सुवर्णपदक मिळाले आहे. विनेश फोगटने महिलांच्या ५३ किलो फ्रीस्टाइल प्रकारात देशाला हे पदक मिळवून दिले. 

या प्रकारात केवळ चार खेळाडूंनी भाग घेतला होता. यामुळे गट फेरीतूनच विजेता निश्चित झाला. विनेशने तिच्या शेवटच्या सामन्यात श्रीलंकेच्या मदुरावाल्गे डॉनचा पराभव केला.

पहिल्या सामन्यात विनेश फोगटने नायजेरियाच्या मर्सी एडेकुरोये आणि कॅनडाच्या समंथा स्टीवर्टचा पराभव केला. राष्ट्रकुल स्पर्धेतील विनेशचे हे सलग तिसरे सुवर्णपदक आहे. यापूर्वी 2014 आणि 2018 मध्येही विनेशने सुवर्णपदक जिंकले होते. विनेश फोगटने जागतिक चॅम्पियनशिप, आशियाई खेळ आणि आशियाई चॅम्पियनशिपमध्येही पदके पटकावली आहेत.