जेव्हा रडत रडत Sachin Tendulkar ने गाठलं होतं पव्हेलियन; 35 वर्षानंतर केला खुलासा

सचिनने स्वतःचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय.

Updated: Aug 18, 2022, 10:12 AM IST
जेव्हा रडत रडत Sachin Tendulkar ने गाठलं होतं पव्हेलियन; 35 वर्षानंतर केला खुलासा title=

पुणे : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने क्रिकेटच्या मैदानावर असंख्य आंतरराष्ट्रीय विक्रम केलेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतकं ठोकणारा तो जगातील पहिला क्रिकेटपटू आहे. पण एक वेळ अशीही आली की सचिन आऊट झाल्यावर रडला. याचा खुलासा खुद्द सचिन तेंडुलकरनेही केला आहे. सचिनने स्वतःचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. यामध्ये तो या मैदानाशी संबंधित काही खास आठवणी चाहत्यांसोबत शेअर करतोय.

सचिनने 1986 मध्ये मुंबईसाठी पहिला अंडर-15 सामना खेळला होता. या सामन्यामध्ये सचिन अवघ्या 4 रन्सवर करून बाद झाला. त्यावेळी पव्हेलियनमध्ये जाताना तो ढसाढसा रडत होता. सचिन हा पहिला सामना ज्या मैदानावर खेळला ते पुण्यातील पीवायसी जिमखाना मैदान होतं. 

आता या ठिकाणी नवीन पव्हेलियन बांधण्यात आलं आहे. तर जुनं बांधकाम तसाच आहे. सचिन 35 वर्षांनंतर या मैदानावर पोहोचला होता.

व्हिडिओमध्ये सचिन म्हणाला, 'मी पुण्याच्या पीवायसी क्लबमध्ये आहे. मी माझा पहिला अंडर-15 सामना इथल्या पीवायसी क्लबच्या मैदानावर खेळला. ही गोष्ट 1986 च्या आसपासची आहे. तेव्हा मी नॉन स्ट्राईकवर फलंदाजी करत होतो. माझ्यासोबत माझा शालेय सहकारी राहुल गणपुलेही होता."

सचिन पुढे म्हणाला, "तो माझ्यापेक्षा सुमारे अडीच वर्षांनी मोठा होता आणि तो चपळ होता. त्याने माझ्यावर ऑफ ड्राईव्ह शॉट मारून 3 रन्स घेण्यासाठी दबाव टाकला. माझं धावणं तितकंसं वेगवान नसल्याने मी रनआऊट झालो. त्यावेळी मी फक्त 4 रन्स केले होते."

'मला अजूनही आठवतंय की मी रडत पॅव्हेलियनमध्ये गेलो होतो. मला पहिल्या सामन्यात चांगला स्कोर करायचा होता. त्यामुळे मी खूप निराश झालो. तेव्हा आमच्या मुंबईच्या टीमचा मॅनेजर अब्दुल इस्माईल होता. तो आणि सर्व वरिष्ठ खेळाडू मला समजावून सांगत होते. अशा वेळी निराशा मागे टाकून जीवनात पुढे जावं. पुन्हा आता मी 35 वर्षांनंतर या मैदानावर आलो आहे. त्यामुळे मी थोडा भावूक झालो आहे.