Womens T20 World Cup 2024 : महिला टी 20 वर्ल्ड कप 2024 सध्या यूएईमध्ये खेळवला जात आहे. मात्र वर्ल्ड कप सुरु असतानाच पाकिस्तानची कर्णधार फातिमा सनावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कर्णधार फातिमा सनाने यंदाच्या महिला टी 20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचे नेतृत्व करून विजयी सुरुवात करून दिली होती. तर दुसऱ्या सामन्यात भारताविरुद्ध त्यांना पराभव स्वीकारावा लागला. मात्र आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या सामन्यापूर्वी ती वर्ल्ड कप सोडून पुन्हा मायदेशात परतणार आहे.
गुरुवारी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने माहिती दिली की महिला क्रिकेट संघाची कर्णधार फातिमा सना हि लवकरच वर्ल्ड कप सोडून मायदेशात परतणार आहे. गुरुवारी फातिमाच्या वडिलांचे निधन झाले. पीसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, 'शुक्रवारी पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या सामन्यात फातिमा खेळू शकणार नाही. तिच्या अनुपस्थितीत उपकर्णधार मुनीबा अली ही ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामन्याचं नेतृत्व करेल.
22 वर्षीय फातिमाने वर्ल्ड कप 2024 मध्ये गोलंदाजी आणि फलंदाजी दोघांमध्ये चांगले प्रदर्शन केले. पाकिस्तानला सेमी फायनलच्या रेसमध्ये टिकून राहण्यासाठी उर्वरित दोन पैकी कमीत कमी एक सामना जिंकावा लागणार आहेत. पाकिस्तानचे सध्या दोन सामन्यांचे दोन पॉईंट्स आहेत. तर ग्रुप ए च्या पॉईंट्स टेबलमध्ये ते भारतानंतर तिसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तान त्यांचा अंतिम सामना हा न्यूझीलंड विरुद्ध खेळेल.
सध्या सुरु असलेल्या आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये फातिमा पाकिस्तानकडून सर्वाधिक विकेट घेणारी खेळाडू आहे. तिने आतापर्यंत 4 विकेट्स घेतले असून पाकिस्तानची लेफ्ट आर्म स्पिनर सादिया इकबाल हिने सुद्धा दोन सामन्यात 4 विकेट्स घेतले आहेत. फातिमा टी20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचं नेतृत्व करणारी तिसरी युवा कर्णधार आहे.