25 लाखांसाठी KBC मध्ये एवढा सोपा प्रश्न! क्रिकेटचे चाहते असाल तर तुम्हाला उत्तर येईलच

Cricket Question On KBC: सोशल मीडियावर केबीसीमध्ये विचारण्यात आलेल्या क्रिकेटसंदर्भातील या प्रश्नाला स्क्रीन शॉट व्हायरल झाला असून अनेकजण कमेंट करुन बरोबर उत्तर काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे हा प्रश्न 25 लाखांचा आहे. तुम्हाला ठाऊक आहे का याचं उत्तर?

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 25, 2023, 11:57 AM IST
25 लाखांसाठी KBC मध्ये एवढा सोपा प्रश्न! क्रिकेटचे चाहते असाल तर तुम्हाला उत्तर येईलच title=
सोशल मीडियावर या प्रश्नाचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला आहे

Cricket Question On KBC: 'कौन बनेगा करोडपती' हा रिअॅलिटी शो ठाऊक नसणारा भारतीय सापडणं तसं कठीण आहे. मागील अनेक वर्षांपासून मनोरंजनाबरोबरच प्रेक्षकांच्या ज्ञानामध्ये भर घालणारा हा कार्यक्रम होस्ट असलेल्या अमिताभ बच्चन यांच्यामुळेही तितकाच लोकप्रिय झाला आहे. या कार्यक्रमामध्ये समाजातील वेगवेगळ्या स्तरातून आलेले सर्वसामान्य लोक मोठी रक्कम जिंकण्याचा प्रयत्न करताना पाहणं अनेकांना वाटतं. या कार्यक्रमादरम्यानचे किस्से, विचारले जाणारे प्रश्न आणि रंजक माहिती कार्यक्रमाचा युएसपी आहे. हल्ली सोशल मीडियावरही या कार्यक्रमाची चांगलीच चर्चा असते. सध्या अशीच एक चर्चा या कार्यक्रमात विचारण्यात आलेल्या क्रिकेटसंदर्भातील प्रश्नाबद्दल सुरु आहे. विशेष म्हणजे हा प्रश्न मागील महिन्यात घडलेल्या घटनेवर आधारित असून तो 25 लाखांसाठी विचारण्यात आला.

प्रश्न काय होता?

ट्वीटरवर व्हायरल होत असलेल्या या कार्यक्रमाच्या टेलिकास्टदरम्यानच्या स्क्रीनशॉटमध्ये स्पर्धकाला विचारण्यात आलेला क्रिकेटसंदर्भातील प्रश्न हा भारतीय गोलंदाजासंदर्भात होता. "वडील आणि मुलगा दोघांनाही बाद करणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू कोण?" असा प्रश्न केबीसीमध्ये विचारण्यात आला होता.  या प्रश्नासाठी A - रविंद्र जडेजा, B - आर. अश्वीन, C - इशांत शर्मा आणि D - मोहम्मद शामी असे पर्याय देण्यात आले होते. तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर ठाऊक आहे का? असेल तर सांगा बरं... 

बरोबर उत्तर काय?

काय म्हणता तुम्हालाही उत्तर ठाऊक नाही? थांबा आम्ही सांगतो या 25 लाखांच्या प्रश्नाचं उत्तर. एकाच भारतीय गोलंदाजाने वडिलांनी आणि मुलाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बाद करण्याची घटना मागील घडली जेव्हा भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध 2 कसोटी सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर गेला होता. या स्पर्धकाने बरोबर उत्तर दिलं. प्रश्नासाठी देण्यात आलेल्या पर्यायांपैकी प्रश्नाचं योग्य उत्तर B - रविंद्रन अश्वीन असं आहे. होय, अश्विननेच चंद्रपॉल बाप-बेट्याच्या जोडीला बाद करण्याचा पराक्रम केला आहे. काही क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया नोंदवाताना 25 लाखांसाठी हा फारच सोपा प्रश्न विचारण्यात आल्याचं म्हटलं आहे.

कधी आणि कोणाविरोधात केलेला हा विक्रम?

नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यामध्ये रविचंद्रन अश्विनने तेजनारायण चंद्रपॉलला पहिल्या कसोटीमध्ये बाद केलं. यापूर्वी अश्विनने शिवनारायण चंद्रपॉललाही बाद केलं आहे. अश्विनने 2011 साली दिल्लीमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या आपल्या पदार्पणाच्या सामन्यामध्ये तेजनारायणचे वडील आणि वेस्ट इंडिजचा दमदार फलंदाज शिवनारायण चंद्रपॉलला बाद केलं होतं.

इतर कोणाच्या नावावर आहे हा विक्रम?

अश्विनशिवाय अशाप्रकारे पिता-पुत्राला बाद करण्याचा विक्रम सध्याच्या सक्रीय खेळाडूंपैकी ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कच्या नावावर आहे. मिचेल स्टार्कनेही चंद्रपॉल पिता-पुत्राला बाद केलं आहे. सध्या तेजनारायणकडून वेस्ट इंडिजच्या संघाला फार अपेक्षा आहेत. तर दुसरीकडे तेजनारायणचे वडील शिवनारायण हा क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. 164 कसोटी, 268 एकदिवसीय सामने आणि 22 टी-20 सामने खेळला आहे. त्याने एकूण 20 हजार 988 धावा केल्या असून ज्यात 41 शतकांचा समावेश आहे.