Corona : कोरोनाचा सामना करण्यासाठी गांगुली मैदानात, गरजूंना अन्नदान

कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी भारताचा माजी क्रिकेटपटू आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली मैदानात उतरला आहे. 

Updated: Apr 5, 2020, 04:20 PM IST
Corona : कोरोनाचा सामना करण्यासाठी गांगुली मैदानात, गरजूंना अन्नदान title=

कोलकाता : कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी भारताचा माजी क्रिकेटपटू आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली मैदानात उतरला आहे. सौरव गांगुलीने इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्सियसनेस म्हणजेच इस्कॉन कोलकाता केंद्राच्या मदतीने गरजूंना मदत केली आहे. गांगुलीने इस्कॉनच्या मदतीने जवळपास २० हजार गरजूंना अन्नदान केलं आहे.

इस्कॉन कोलकात्याचे प्रवक्ता आणि उपाध्यक्ष राधारमण दास म्हणाले, 'कोलकात्यामध्ये प्रत्येक दिवशी १० हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था करणाऱ्या सौरव गांगुली यांना धन्यवाद. त्यांच्या मार्गदर्शनाखाली इस्कॉन कोरोनाविरुद्धची लढाई लढत आहे. दादाची ही सर्वोत्तम खेळी आहे. आम्ही त्यांना धन्यवाद देतो.'

इस्कॉन संपूर्ण देशात जवळपास ४ लाख गरजूंना अन्न देत आहे. याआधी सौरव गांगुलीने रामकृष्ण मिशनचं मुख्यालय असलेल्या बेलूर मठामध्ये २० हजार किलो तांदूळ दान केले होते. त्याआधी गांगुलीने लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या गरजूंना ५१ लाख रुपयांचे तांदूळ देण्याचा निर्णय घेतला होता. तसंच गांगुली अध्यक्ष असलेल्या बीसीसीआयने पीएम केयर्स या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाचा सामना करण्यासाठी तयार केलेल्या फंडात ५१ कोटी रुपये दिले.