बीसीसीआय रवी शास्त्री आणि विराट कोहलीला विचारणार जाब

भारत-न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्यात धोनीला सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी का पाठवले?

Updated: Jul 12, 2019, 06:42 PM IST
बीसीसीआय रवी शास्त्री आणि विराट कोहलीला विचारणार जाब title=

नवी दिल्ली: विश्वचषक स्पर्धेतील खेळाडुंच्या निवडप्रक्रियेसंदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या प्रशासकीय समितीकडून (COA) भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांना जाब विचारला जाण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या या समितीमध्ये अध्यक्ष विनोद राय, डायना एडुलजी आणि निवृत्त जनरल रवी थोडगे यांचा समावेश आहे. 

भारतीय संघ इंग्लंडमधून परतल्यानंतर ही समिती विराट कोहली आणि रवी शास्त्री यांच्याशी चर्चा करेल. तसेच पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेन्टी-२० स्पर्धेसाठी बीसीसीआयची काय रणनीती आहे, यासंदर्भात निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांच्यासोबतही प्रशासकीय समितीच्या अधिकाऱ्यांची बैठक होईल, अशी माहिती विनोद राय यांनी दिली. 

अमित शहांमुळे भारत विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात खेळणार; ओमर अब्दुल्लांचा टोला

विश्वचषक स्पर्धेच्यावेळी बदली खेळाडू म्हणून अंबाती रायडूला डावलून ऋषभ पंत आणि मयांक अग्रवाल यांना इंग्लंडमध्ये पाचारण करण्यात आले होते. यावरून बराच गदारोळही झाल होता. त्यामुळे आगामी बैठकीत यासंदर्भात रवी शास्त्री, विराट कोहली आणि एमएसके प्रसाद यांना प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. याशिवाय, भारत-न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्यात धोनीला सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी का पाठवले, याबाबतही शास्त्री व कोहली यांना जाब विचारला जाऊ शकतो.

टीम इंडीयाच्या पराभवाचा धक्का सहन न झाल्याने चाहत्याचा आत्महत्येचा प्रयत्न

भारतीय संघाला बुधवारी विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात न्युझीलंडकडून १८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. यामुळे भारताचे विश्वचषक स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले होते.