Champions Trophy 2025: पाकिस्तानला मोठा झटका; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ICC कडून प्लॅन B तयार

ICC Plan B For Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेसाठी टीम इंडिया पाकिस्तानचा दौरा करणार की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही. बीसीसीआयने या प्रकरणावर अधिकृतपणे स्पष्टीकरण दिलेलं नाही. 

सुरभि जगदीश | Updated: Aug 4, 2024, 04:15 PM IST
Champions Trophy 2025: पाकिस्तानला मोठा झटका; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ICC कडून प्लॅन B तयार title=

ICC Plan B For Champions Trophy 2025: सध्या टीम इंडिया वनडे फॉर्मेटवर भर देतेय. पुढच्या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफी खेळायची आहे. 19 फेब्रुवारी ते 9 मार्च या कालावधीमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवली जाणार आहे. दरम्यान ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये खेळवली जाणार आहे. मात्र टीम इंडिया पाकिस्तानमध्ये खेळायला जाण्यास नकार देईल. अशा परिस्थितीत आयसीसीने प्लान बी तयार केला असल्याची माहिती आहे. 

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेसाठी टीम इंडिया पाकिस्तानचा दौरा करणार की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही. बीसीसीआयने या प्रकरणावर अधिकृतपणे स्पष्टीकरण दिलेलं नाही. तरी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तान दौऱ्यावर जाण्याच्या मूडमध्ये नसल्याचे मीडिया रिपोर्ट्सवरून स्पष्ट झालंय. अशातच आता आयसीसीने पाकिस्तानला 440 व्होल्टचा धक्का देऊन स्पर्धेसाठी प्लॅन-बी तयार केला आहे.

आयसीसीने कोलंबोमध्ये नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी सुमारे $65 दशलक्ष बजेट मंजूर करण्यात आलं आहे. या बजेटमध्ये आयसीसीने सध्या चर्चेत असलेल्या सर्व पैलूंचा समावेश केला आहे. म्हणजेच भारताने स्पर्धेसाठी पाकिस्तानचा दौरा केला नाही तर काही सामने पाकिस्तानबाहेरही आयोजित केले जाऊ शकतात हे लक्षात घेऊन आयसीसीने बजेट जाहीर केलं आहे. क्रिकबझने दिलेल्या अहावालात ही बाब समोर आली आहे. 

अशाप्रकारे आयसीसीने आपल्या प्लॅन बी सह पाकिस्तानला स्पष्टपणे 440 व्होल्टचा धक्का दिला आहे. या स्पर्धेचं शेड्यूल अजून जाहीर करण्यात आलेलं नाही, मात्र पाकिस्तानने टीम इंडियाला डोळ्यासमोर ठेवून स्पर्धेचं वेळापत्रक तयार केलंय. या वेळापत्रकानुसार टीम इंडियाचे सर्व सामने लाहोरमध्ये खेळवण्यात येणार आहेत. टीम इंडियाला पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंडसह ग्रुप-1 मध्ये ठेवण्यात आलं आहे.

एशिया कपमध्ये टीम इंडिया नाही करणार पाकिस्तानचा दौरा?

2023 मध्ये खेळल्या गेलेल्या आशिया कपचं यजमानपदही पाकिस्तानला मिळणार होतं. मात्र टीम इंडियाने या स्पर्धेसाठी पाकिस्तानमध्ये जाणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. भारतीय टीमविरुद्धचे सामने श्रीलंकेत हायब्रीड मॉडेल अंतर्गत खेळले गेले. आता चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत अंतिम निर्णय काय होतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.