मुंबई : न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० सीरिजमध्ये भारताचा ५-०ने विजय झाला. टी-२० सीरिज ५-०ने जिंकणारी भारतीय टीम ही जगातली पहिलीच टीम ठरली. या सीरिजच्या पाचव्या मॅचनंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीचा मैदानामध्ये फोनवर बोलतानाचा एक फोटो व्हायरल झाला. विराट कोहली फोनवर नेमका कोणाशी बोलत होता? याबाबत चर्चा सुरु झाल्या.
ईएसपीएन क्रिकइन्फो या वेबसाईटने त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरून 'तुम्ही विराट कोहलीसोबत फोनवर बोलत असाल तर, त्याला काय सांगाल?' असा सवाल विचारला. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या या प्रश्नाला इंग्लंडचा ऑल राऊंडर बेन स्टोक्सने भन्नाट उत्तर दिलं. 'विराटचा फोन आला तर त्याला बेन स्टोक्स म्हणेन, माझ्या बोलण्याचा अर्थ तुम्हाला कळला असेलच,' अशी प्रतिक्रिया बेन स्टोक्सने दिली.
“Ben Stokes” if you know you know https://t.co/xgZtYFQAoR
— Ben Stokes (@benstokes38) February 3, 2020
विराट कोहली हा मैदानात अनेकवेळा अपशब्द वापरताना दिसला आहे. यानंतर क्रिकेट चाहत्यांनी विराट कोहलीला ट्रोल करत बेन स्टोक्सवरही निशाणा साधला. विराट कोहली मैदानात शिवी देत नाही, तर तो 'बेन स्टोक्स' म्हणतो, अशा मीम व्हायरल झाल्या. या मीम शेयर करताना बेन स्टोक्सचं नाव घेतल्यामुळे तोदेखील वैतागला होता.
माझं नाव वारंवार ऐकून मला कंटाळा आला आहे. आता पुन्हा जर विराटचा संदर्भ देताना माझं नाव घेतलंत तर मी ट्विटर अकाऊंट डिलीट करेन, असा इशाराही बेन स्टोक्सने दिला होता.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजमध्ये बॅटिंग करत असताना रोहित शर्मानेही पुजाराबाबात अपशब्द वापरला होता. 'पुजी भाग ***' असं म्हणतानाचा रोहितचा आवाज स्टम्प मायक्रोफोनमध्ये कैद झाला होता. यानंतरही बेन स्टोक्सने ट्विट केलं होतं. 'यावेळी विराट नाही तर रोहित म्हणाला, मी काय म्हणतोय ते कळलं असेलंच,' असं स्टोक्स या ट्विटमध्ये म्हणाला होता.