मुंबई : कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे देशभरातला लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊन वाढवण्यात आल्यामुळे बीसीसीआयनेही आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलं आहे. बीसीसीआयने याची अधिकृत घोषणा केली नसली तरी आयपीएलच्या ८ टीम आणि प्रसारण करणाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. आयपीएल रद्द करण्यात आली नसली, तरी अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आल्याचं बीसीसीआयने संबंधितांना सांगितलं आहे.
'बीसीसीआयने आयपीएल स्थगित करण्यात आल्याचं आम्हाला सांगितलं आहे, पण वर्षाच्या शेवटी आयपीएल खेळवली जाईल, अशी आमची अपेक्षा आहे,' असं एका टीमचा अधिकारी म्हणाला.
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह सरकारच्या आदेशाची वाट पाहत होते, असं बोललं जात आहे. लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्यात आल्यामुळे एप्रिल-मेपर्यंत आयपीएल होण्याचा प्रश्नच नव्हता. २९ मार्च ते २४ मे या कालावधीत आयपीएल स्पर्धा खेळवली जाणार होती. कोरोनाचं वाढतं संकट लक्षात घेता सुरुवातीला आयपीएल १४ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली होती.