Cricket News : महाराष्ट्राच्या जालना (Jalna) जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. जालना येथे सुरु असलेल्या क्रिकेट सामन्यादरम्यान मैदानात एका फलंदाजाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. जालन्यातील डॉक्टर फ्रेजर बॉयज़ मैदानावर आयोजित केलेल्या एका क्रिकेट सामन्यादरम्यान नॉन स्ट्राईक एंडवर असलेला फलंदाज अचानकपणे खाली बसला आणि हळूहळू त्याची स्थिती बिघडू लागली. जो पर्यंत त्याला वाचवण्यासाठी काही प्रयत्न केले जातील तो पर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. मृत्यू झालेल्या खेळाडूचे नाव विजय पटेल असून तो मुंबईतील नालासोपाऱ्याचा रहिवासी होता.
क्रिकेट खेळताना फलंदाजाचा मृत्यू :
जालना जिल्ह्यातील ही घटना 25 डिसेंबर रोजी नाताळ सणानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेदरम्यान घडली. 'ख्रिसमस ट्रॉफी क्रिकेट मॅच' दरम्यान खेळाडू विजय पटेलला मैदानात हार्ट अटॅक आला. खेळाडूला मैदानात कोसळताना पाहून खेळाडू आणि आयोजकांनी परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न केला. परंतु तो पर्यंत खूप उशीर झाला होता. मैदानातच विजयने प्राण सोडले होते.
दिवंगत खेळाडू विजय पटेल याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत ठोस माहिती समोर आलेली नाही परंतु प्राथमिक तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार त्याचा मृत्यू हा हार्ट अटॅकमुळे झालेला आहे. संबंधित घटनेबाबत माहिती मिळाल्यावर पोलीस आणि मेडिकल टीम घटनास्थळी पोहोचली आणि खेळाडूचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार खेळाडू विजय पटेल हा क्रिकेटचा सामना सुरु असताना पूर्णतः फिट होते आणि उत्साहित होते. अचानकपणे त्याने छातीत दुखत असल्याचे सांगितले आणि तो क्षणार्धात जमिनीवर कोसळला. सोबतच्या खेळाडूंनी लगेचच मेडिकल टीमला बोलावले परंतु तोपर्यंत विजयचा मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर आयोजन समितीने क्रिकेट सामने तात्काळ रद्द केले.
हेही वाचा : यशस्वी जयस्वालच्या विकेटवरून वाद, गावसकर अंपायरवर भडकले, मेलबर्न टेस्टमध्ये नेमकं काय घडलं?
सदर घटनेनं जालन्यातील क्रिकेट रसिकांना धक्का बसलाय. विजय पटेल याच्या आकस्मित मृत्यूमुळे कुटुंबावर सुद्धा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. क्रिकेट सामन्याच्या आयोजन समितीने विजयच्या कुटुंबाला लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा अशा घटना घडल्याचं समोर आलं होतं. यावर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की शारीरिक हालचालींदरम्यान कारण नियमित आरोग्य तपासणी न करणे हे सुद्धा आहे. याप्रकरणी जालना पोलिसांनी तपास सुरू केला असून पोस्टमार्टक अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे या अधिकाऱ्याने सांगितले.