ऑस्ट्रेलियाविरोधातील पाचव्या कसोटी मालिकेत जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) संघाचं नेतृत्व करणार आहे. सिडनीमध्ये होणाऱ्या या सामन्यातून निष्प्रभ ठरलेल्या रोहित शर्माने माघार घेतली आहे. रोहित शर्माने स्वत: या सामन्यातून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, 37 वर्षीय रोहित शर्माने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्याने आपण सामन्यातून बाहेर पडत असल्याचं सांगितलं. एकमताने हा निर्णय घेण्यात आला.
भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चां रंगल्या आहेत. यादरम्यान रोहित शर्माने बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या अंतिम सामन्याच्या प्रॅक्टिस सेशनमध्ये हजेरी लावली होती. यानंतर गौतम गंभीरने सामन्याआधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सर्व दावे फेटाळले होते. पण रोहित शर्मा खेळणार की नाही यावर भाष्य कऱणं टाळलं होतं. "रोहित शर्माच्या बाबतीत सर्व काही ठीक आहे. यामध्ये पारंपारिक असं काही नाही. मुख्य प्रशिक्षक येथे आहेत आणि ते पुरेसं आहे," असं गंभीरने म्हटलं होतं.
गौतम गंभीरच्या प्रतिक्रियेवरुन रोहित शर्मा विश्रांती घेणार असल्याचं स्पष्ट झालं. जसजसा दिवस सरकत होता तसतसं रोहितबाबतचा दावा अधिक भक्कम होत होता. गौतम गंभीर, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह नेटमध्ये बराच वेळ चर्चा करताना दिसले. दुसरीकडे फलंदाजही बराच वेळ नेटमध्ये घाम गाळत होते. रोहित शर्माने सराव करताना घातलेल्या कपड्यांवरुन तो खेळणार नसल्याचा अंदाज व्यक्त होत होता.
पर्थमध्ये पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवून देणारा जसप्रीत बुमराह पुन्हा एकदा संघाचं नेतृत्व करणार आहे. भारताने 295 धावांनी हा सामना जिंकला होता. भारताला आता आपली लाज राखायची असेल तर सिडनीमधील सामना जिंकावा लागणार आहे. त्यासाठी बुमराहसारख्या कर्णधाराचीच गरज आहे. दरम्यान जर रोहित शर्मा सिडनीमधील सामन्यासाठी मैदानात उतरला नाही तर यानंतर तो निवृत्ती जाहीर करु शकतो.
दरम्यान रोहित शर्माच्या अनुपस्थितीत शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यास उतरण्याची शक्यता आहे. त्याने अॅडलेड येथे 28 आणि 31 धावा केल्या होत्या.