David Warner On Champions Trophy : एखादा माणूस खूप वर्ष काम करत राहिला तर ग्रेट होतो का? खूप वर्ष चांगलं काम करत राहिला यातच त्याच्या महानतेचं बीज दडलेलं असतं. मैदान गाजवण्यापैक्षा मैदानात टिकणारा खेळाडू खऱ्या अर्थाने महान ठरतो. अशाच एका तगड्या खेळाडूने आज वनडे क्रिकेटला रामराम ठोकला. आपल्या करियरची अखेरची टेस्ट मॅच खेळण्यापूर्वी वनडेला निरोप घेताना डेव्हिड वॉर्नर भावूक झाल्याचं दिसून आलं. वादाच्या भोवऱ्यात सापडून देखील स्वत:ला सिद्ध करण्याचं सामर्थ्य डेव्हिड वॉर्नरमध्ये होतं आणि त्याने ते करुन देखील दाखवलंय. डेव्हिड वॉर्नरने निवृत्ती (David Warner Retirement) जाहीर केल्यावर एक वक्तव्य केलं. त्यामुळे सध्या चर्चेला उधाण आलंय.
काय म्हणतो David Warner ?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करताना डेव्हिड वॉर्नरने (David Warner) चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये पुनरागमन करण्याचे संकेत दिले आहेत. जर मी चांगलं क्रिकेट खेळत राहिलो आणि ऑस्ट्रेलियन संघाला 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी (Champions Trophy) माझी गरज भासली तर तो संघासाठी नक्कीच उपस्थित असेल, असं डेव्हिड वॉर्नरने निवृत्तीची घोषणा करताना म्हटलं आहे.
मी कसोटीसह एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. मी वनडे वर्ल्ड कप दरम्यान म्हणालो होतो की, भारतात विजय मिळवणं खूप मोठा पराक्रम असेल. आम्ही ती किमया करू शकलो, याचा मला खूप आनंद आहे. पण मला माझी पत्नी कँडिस आणि तिन्ही मुली, आयव्ही, इसला आणि इंडीला अधिक वेळ द्यायचा आहे, असं डेव्हिड वॉर्नरने म्हटलं आहे.
ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी सलामीवीर फलंदाज म्हणून ओळख असलेल्या वॉर्नरने ऑस्ट्रेलियासाठी सलामीचा पर्याय खुला ठेवलाय. ऑस्ट्रेलियाकडे एकापैक्षा एक तगडे फलंदाज आहेत. मात्र, वनडे क्रिकेटमध्ये अनेक पर्याय असताना वॉर्नरला जागा मिळेल का? असा सवाल विचारला जातोय. तर चॅम्पियन ट्रॉफी खेळायची होती तर डेव्हिड वॉर्नरने निवृत्ती का घेतला? असे प्रश्न विचारत काहींनी वॉर्नरला धारेवर धरलंय.
दरम्यान, वर्ल्ड कप 2023 मध्ये वॉर्नर ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. 11 सामन्यांच्या 11 डावांमध्ये 48 च्या सरासरीने आणि 108.3 च्या स्ट्राईक रेटने 535 धावा केल्या होत्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला दुसरा वॉर्नर भेटणं शक्य होणार नाही. त्यामुळे वॉर्नरने असा पर्याय खुला ठेवलाय, अशी चर्चा होताना दिसते. वॉर्नरने एकदिवसीय सामन्यांच्या 159 डावांमध्ये 6932 धावा केल्या आहे. त्यामुळे कोणी कसलेही आरोप केले तरी शतक झाल्यावर 6 फूट उडी मारून ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड कप जिंकवणारा वॉर्नरच होता.