Asia Cup 2023 Rohit Sharma: आजपासून म्हणजेच 30 ऑगस्ट 2023 पासून आशिया चषक स्पर्धेला सुरुवात होत आहे. आज पाकिस्तानविरुद्ध नेपाळच्या सामन्याने या स्पर्धेला सुरुवात होत असून स्पर्धा 30 ऑगस्ट ते 17 सप्टेंबरदरम्यान ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. भारताचा पहिला सामना 2 सप्टेंबर रोजी होणार आहे. मात्र या स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच रोहित शर्माने त्याच्या कामगिरीबद्दल एक सूचक विधान केलं आहे. रोहित शर्माने त्याला शतकं झळकावण्यात अपयश का येत आहे याबद्दलचं स्पष्टीकरण दिलं आहे.
भारतीय कर्णधार रोहित शर्माने संघाच्या गरजेनुसार आपल्या फलंदाजीच्या शैलीत बदल केला आहे. त्यामधून मिळालेल्या यशामुळे तो समाधानी आहे. अनेकदा त्याला यामुळे शतकी खेळी करता येत नाही. विश्वचषक 2019 च्या शेवटी रोहित शर्माच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 27 शतकं होती. मागील 4 वर्षांमध्ये त्याला केवळ 3 शतकं झळकावता आली आहेत. रोहित शर्माने यासंदर्भात भाष्य केलं आहे. मी फलंदाजी करताना धोके पत्कारण्यास सुरुवात केली. त्यामुळेच हे असं शतकांची संख्या कमी होण्याचा प्रकार घडला, असं विश्लेषण रोहितने केलं आहे.
रोहित शर्माने पीटीआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना, "मी अधिक धोके पत्कारण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे माझ्या शतकांची संख्या कमी झाली आहे," असं म्हटलं. माझा एकदिवसीय क्रिकेटचा स्ट्राइक रेट वाढला आहे. मात्र सरासरी नक्कीच कमी झाली आहे. फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी मला ही गोष्ट सांगितल्याचं रोहितने स्पष्ट केलं. रोहित हा एकमेव असा क्रिकेटपटू आहे ज्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 3 द्विशतकं झळकावली आहे. त्याने यापूर्वी 150 हून अधिक धावांची खेळी करुन 4 वर्ष उलटली आहेत. वेस्ट इंडिजविरुद्ध 2019 साली विशाखापट्टणममधील सामन्यात त्याने ही कामगिरी केलेली.
रोहित शर्माने दिलेल्या माहितीनुसार, दरम्यानच्या कालावधीमध्ये मला अनेक तडजोडी कराव्या लागल्या. माझ्या करिअरमधील स्ट्राइक रेट जवळजवळ 90 चा होता. मात्र मागील 2 वर्षांमध्ये स्ट्राइक रेट 105-110 पर्यंत आहे. याचाच अर्थ असा की कुठे ना कुठे तुम्हाला तडजोड करावी लागते, असंही रोहित म्हणाला. 55 वी सरासरी असेल आणि स्ट्राइक रेट 110 चा असेल असं शक्य नाही असं सांगतानाच अशी जोखीम घेणे हा पूर्णपणे माझा निर्णय असल्याचंही रोहितने स्पष्ट केलं आहे. माझ्या फलंदाजीची सामान्य शैली अजूनही मला ठाऊक आहे. मात्र मला इतर गोष्टी ट्राय करायच्या होत्या आणि त्या निकालांवर मी समाधानी आहे.
फंलदाजीमधील बदलांबद्दल मी संघ व्यवस्थापनाला कल्पना दिल्याचंही रोहितने सांगितलं. प्रत्येकाला दिर्घकाळ फलंदाजी करायची असते. प्रत्येकाला आपण 150 ते 170 धावा कराव्यात असं वाटतं. मला आजही अशीच कामगिरी करावीशी वाटते. मात्र तुम्ही यापूर्वी जे केलं नाही ते करणं अधिक चांगलं असतं असं मला वाटतं. हीच गोष्ट तुमच्या फलंदाजीसंदर्भातील योग्यतेमध्ये जोडली जाते. तुम्ही जोपर्यंत नव्या गोष्टी करत नाही तोपर्यंत त्याचे परिणाम तुम्हाला दिसत नाहीत, असं रोहित म्हणाला.