मुंबई : भारतीय चाहत्यांसाठी सर्वांत मोठी बातमी समोर आली आहे. कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) पुन्हा एकदा मैदानात भिडताना दिसणार आहेत. आशिया कपमध्ये हे दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी मैदानात भिडणार आहेत. ही स्पर्धा नेमकी कधी रंगणार आहे व या स्पर्धेचे वेळापत्रक जाणून घेऊयात.
भारत-पाकिस्तानमध्ये (India vs Pakistan) रंगणाऱ्या प्रत्येक सामन्याची उत्सुकता भारतीय चाहत्यांना असते. सर्वंच चाहता वर्ग आपआपलं काम आवरून या सामन्यासाठी वेळ काढत असतो. एकूणचं काय तर या सामन्याची क्रिकेट चाहते नेहमीच आतुरतेने वाट पाहत असतात. या चाहत्या वर्गासाठी आनंदाची बातमी आहे. आता भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ लवकरच क्रिकेटच्या मैदानावर भिडणार आहेत. हा सामना आशिया कपमध्ये खेळवला जाणार आहे. आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) ची सुरुवात २७ ऑगस्टपासून होणार आहे. मात्र, या स्पर्धेचे पूर्ण वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.
'या' तारखेला रंगणार सामना
यंदा आशिया कपचे (Asia Cup 2022) यजमानपद श्रीलंकेला देण्यात आले आहे. या आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान आमने-सामने येणार आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, आशिया कप सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा सामना खेळवला जाऊ शकतो. म्हणजेच २८ ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना चाहत्यांना पाहायला मिळू शकतो. २८ ऑगस्ट रोजी रविवार असल्याने या दिवसाची निवड करण्यात आलीय. या दिवशी दोन्ही संघाच्या मोठ्या चाहत्या वर्गामुळे मॅचमध्ये जास्तीत जास्त टीआरपी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या खास दिवसाची निवड करण्यात आलीय.
संभाव्य वेळापत्रक
श्रीलंकेने स्पर्धेच्या आयोजनाची तयारी सुरू केली आहे. २१ ऑगस्टपासून क्वालिफायर फेरी खेळवली जाईल. तर मूळ स्पर्धेचे सामने २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत होणार आहेत. टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्मा करणार असून पाकिस्तानचे नेतृत्व बाबर आझमकडे आहे.