मुंबई: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे अनेक विक्रम आपल्याला माहिती असतील. माहीच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी करण्याचं धाडस आंतरराष्ट्रीय स्तरावरील एका खेळाडूनं केलं आहे. जगभरात सध्या त्याच्या नावाची य़ामुळे चर्चा सुरू आहे. कोण आहे हा खेळाडू जाणून घेऊया.
33 वर्षांचा अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार असगर अफगाणने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे. अफगाणिस्तान क्रिकेट संघाला 41टी 20 सामने जिंकवून दिले असून आता त्याने माहीची बरोबरी केली.
महेंद्रसिंह धोनीने आपल्या नेतृत्वात 72 टी -20 सामन्यांपैकी 41 सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवून दिला होता. जागतिक क्रिकेटमध्ये आतापर्यंत हा विक्रम फक्त धोनीच्या नावावर होता मात्र त्याची बरोबरी आता अफगाणिस्तान संघाच्या कर्णधारानं केली आहे. झिम्बाब्वे विरुद्धच्या दुसऱ्या टी -२० सामन्यात अफगाणिस्तानला विजय मिळवून दिला. या विजयानंतर असगरनं विश्व विक्रमात माहीची बरोबरी केली आहे.
टी 20 मध्ये सर्वाधिक विजय मिळवून देणारे कर्णधार
1. महेंद्रसिंह धोनी आणि असगर अफगाण- दोघांनीही प्रत्येकी 41 सामने जिंकवून दिले आहेत.
2. इयोन मॉर्गन- 33 सामने
3. सरफराज अहमद- 29 सामने
अबुधाबी येथे शुक्रवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी -20 सामन्यात अफगाणिस्तानने झिम्बाब्वेला 45 धावांनी पराभूत केले. या विजयासह अफगाणिस्तानने तीन सामन्यांच्या टी -२० मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आणि मालिका जिंकली. या मालिकेसोबतच संघाच्या कर्णधारानं विश्व विक्रमात माहीची बरोबरी केली आहे.