कोलंबो : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरनं पहिली विकेट घेतली आहे. भारताच्या श्रीलंकेविरुद्धच्या अंडर-१९ टेस्ट मॅचला कोलंबोमध्ये सुरुवात झाली आहे. या मॅचमध्ये अर्जुन तेंडुलकरनं कमील मिशाराला एलबीडब्ल्यू आऊट केलं. अंडर-१९ क्रिकेटमधली ही अर्जुनची पहिली विकेट ठरली. या मॅचमध्ये श्रीलंकेनं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. यानंतर भारताचा कर्णधार अनुज रावतनं अर्जुन तेंडुलकरला पहिली ओव्हर दिली. अर्जुन तेंडुलकरनं त्याच्या दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलला कमिलला एलबीडब्ल्यू केलं.
डावखुरा फास्ट बॉलर असलेला अर्जुन तेंडुलकर याआधी मुंबईच्या अंडर १४ आणि अंडर १६ टीमकडून खेळला. पण इंग्लंडचा विकेट कीपर बॅट्समन जॉनी बेअरस्टोला नेटमध्ये बॉलिंग केल्यानंतर अर्जुन प्रकाशझोतात आला. मागच्या वर्षी जुलै महिन्यात लॉर्ड्सच्या मैदानात सराव करताना अर्जुनच्या बॉलिंगवर बेअरस्टोला दुखापत झाली होती. २०१७ सालच्या महिलांच्या वर्ल्ड कपवेळीही अर्जुन तेंडुलकरनं भारतीय महिला टीमला सराव म्हणून बॉलिंग केली होती.