मुंबई : आयपीएल 2018 मध्ये दोन वर्षांच्या बॅननंतर परतलेल्या चेन्नई टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी आहे, हे तर सगळ्यांनाच माहीत आहे... याच धोनीच्या नेतृत्वाखाली टीमनं आयपीएलच्या या सीझनमध्ये दमदार प्रदर्शन केलंय... त्यामुळे टीमचं सगळीकडेच कौतुक होतंय. आयपीएल 2018 मध्ये चेन्नईची टीम पुनरागमन करणार आहे आणि या टीमचे नेतृत्व टीम खुद्द महेंद्रसिंग धोनीकडे सोपवण्यात आलाय ही बातमी समजल्यानंतर फॅन्सला एकच आनंद झाला होता... चेन्नईच्या या जाहीरनाम्यानंतर फॅन्सनं धोनीला 'थाला'ची उपाधी दिलीय.
महेंद्रसिंग धोनीला सपोर्ट करण्यासाठी मैदानात आलेले फॅन्स 'थाला'चं टी-शर्ट परिधान करतात. या जर्सीवर धोनीचा जर्सीचा नंबर 7 आणि 'थाला' लिहिलेलं असतं. यासोबतच चेन्नई टीम मॅनेजमेंटच्या ट्विटमध्येही धोनीचा उल्लेख 'थाला' म्हणून केला जातो. मात्र, धोनीला 'थाला' म्हणण्याला एका क्रिकेटपटूनं मात्र साफ नकार दिलाय. हा क्रिकेटपट म्हणजे श्रीसंत...
धोनीनंही आपल्या इन्स्टाग्राम पेजवरून एक फोटो शेअर केला होता... यामध्येही तो पिवळ्या रंगाची जर्सी परिधान करून उभा असलेला दिसतोय त्यावरही 'थाला' असं लिहिलंय. उल्लेखनीय म्हणजे, 'थाला' हा तमिळ शब्द आहे. याचा अर्थ आहे लीडर किंवा बॉस... परंतु, श्रीसंतचा यालाच आक्षेप आहे.
श्रीसंतच्या म्हणण्यानुसार, लोक धोनीला उगाचच 'थाला' म्हणतात... असली थाला तर एकच आहे आणि तो म्हणजे तमिळ फिल्मचा सुपरस्टार अजित कुमार... अजित कुमारला 'थाला'ची उपाधी 2001 मध्ये ए आर मुरुगदास दिग्दर्शित सिनेमा 'दीना'नंतर देण्यात आली होती. या सिनेमात अजित कुमार नकारार्थी भूमिकेत दिसला होता... आणि त्याचं सिनेमातलं नाव 'थाला' होतं...
श्रीसंतनं यूट्यूबवर एक व्हिडिओ प्रदर्शित केला. यामध्ये तो म्हणतोय, मला धोनीचा अभिमान आहे... त्याच्याच नेतृत्वाखाली आम्ही विश्वकप जिंकलाय. परंतु, धोनी 'थाला' नाही... थाला केवळ एक आहे... आणि तो म्हणजे अजित...