Ind vs Pak: टीम इंडियाच्या विजयानंतर अमित शहा म्हणतात...

भारतीय संघाने पाकिस्तानवर आणखी एक सर्जिकल केला.

Updated: Jun 17, 2019, 08:07 AM IST
Ind vs Pak: टीम इंडियाच्या विजयानंतर अमित शहा म्हणतात... title=

नवी दिल्ली: विश्वचषक स्पर्धेत भारताने आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर देशभरात आनंद साजरा होत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीदेखील ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी म्हटले की, भारतीय संघाने पाकिस्तानवर आणखी एक सर्जिकल केला आणि पु्न्हा तोच निकाल लागला. या विजयासाठी भारतीय संघाचे अभिनंदन. प्रत्येक भारतीयाला याचा गर्व असल्याचे अमित शहा यांनी म्हटले. 

भारतीय संघाने पाकिस्तानचा ८९ धावांनी पराभव केला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ३३७ धावांचे आव्हान उभे केले. पण पाऊस पडल्याने डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे पाकिस्तानला विजयासाठी ४० षटकांत ३०२ धावांचे आव्हान मिळाले. पण पाकिस्तानला केवळ २१२ धावाच करता आल्या. 

भारताकडून विजय शंकर, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या. भारताने ठेवलेल्या या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानला सुरुवातीलाच पहिला धक्का बसला. विजय शंकरने इमाम उल हकला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर फकर जमान आणि बाबर आझम यांनी चांगली भागीदारी करत पाकिस्तानच्या डावाला स्थैर्य मिळवून दिले. फकर जमानने ६२ तर बाबर आजमने ४८ धावा केल्या. मात्र, हे दोघे बाद झाल्यानंतर पाकिस्तानचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत राहिले. 

या विजयाबरोबर भारताने विश्वचषक स्पर्धेतील पाकविरुद्धची आपली विजयी मालिका कायम ठेवली आहे. यापूर्वी १९९२, १९९६, १९९९, २००३, २०११ आणि २०१५ साली भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली होती.