20 वर्षीय भारतीय फास्ट बॉलरचा क्रिकेटच्या मैदानातच मृत्यू; बॉलिंगसाठी रनअप घेताना...

Indian Fast Bowler Dies During Cricket Match: मैदानातच मरण पावलेला खेळाडू हा अवघ्या 20 वर्षांचा होता. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं. मात्र त्याची प्राणज्योत मालवली  

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 27, 2024, 06:22 AM IST
20 वर्षीय भारतीय फास्ट बॉलरचा क्रिकेटच्या मैदानातच मृत्यू; बॉलिंगसाठी रनअप घेताना... title=
त्याने मैदानात सोडला प्राण (प्रातिनिधिक फोटो)

Indian Fast Bowler Dies During Cricket Match: क्रिकेटच्या मैदानामध्ये अचानक खेळाडूंचा मृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. मागील काही काळात या अशा घटनांचंप्रमाण वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. भारताच्या वेगवेगळ्या भागांमधून अशापद्धतीच्या बातम्या समोर येत आहेत. कधी स्थानिक क्रिकेट स्पर्धेत तर कधी एखाद्या गल्ली क्रिकेटमधील सामन्यात अचानक काही कारणाने खेळाडूचा मृत्यू झाल्याच्या बातम्या वाचून खरंच असं होऊ शकतं का असा प्रश्न पडावा अशापद्धतीने तरुण प्राण गमावत आहेत. काही घटनांमध्ये धावता धावात पडल्यानंतर खेळाडूचा मृत्यू होतो तर कधी मैदानात झालेल्या दुखापतीमधून खेळाडू दगावतो. असाच काहीसा प्रकार आता जम्मू आणि काश्मीरमधून समोर आला आहे. या राज्यातील एका तरुण वेगवान गोलंदाजाचं निधान झालं आहे. 

गोलंदाजी करताना रनअप दरम्यानच...

समोर आलेल्या माहितीनुसार मरण पावलेला खेळाडू अवघ्या 20 वर्षांचा होता. या खेळाडूचं नाव शोएब यासीन असं होतं. त्याला जुनैद नावानेही ओळखलं जायचं. मैदानामध्ये गोलंदाजी करताना रनअप दरम्यानच शोएब कोसळला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. शोएबचे वडील मोहम्मद यासिन हे बारामुल्लामधील हांजीवरा येथे राहतात. काही वर्षांपूर्वी क्रिकेटच्या मैदानात उसळता चेंडू लागून जखमी झाल्यानंतर मरण पावलेल्या ऑस्ट्रेलियाच्या फिलिप ह्युजेस प्रकरणाची आठवण करुन देणारा प्रकार जम्मू-काश्मीरमध्ये घडला. 

हांजीवर येथील सामन्यात घडला हा प्रकार घडला

जम्मू-काश्मीरमधील वृत्तसंस्था असलेल्या के एन एस म्हणजेच काश्मीर न्यूज सर्व्हिसने दिलेल्या वृत्तानुसार, शोएब यासिनचा मृत्यू शुक्रवारी म्हणजेच (27 जानेवारी रोजी) झाला. बारामुल्लातील पठाण येथील हांजीवर येथील सामन्यात हा प्रकार घडला. गोलंदाजी करण्यासाठी रन-अप घेत असतानाच अचानक शोएब मैदानात कोसळला. या घटनेनंतर शोएबला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तिथे त्याला मृत घोषित केलं गेलं. शोएबने मैदानात प्राण सोडल्याचं सांगितलं जात आहे.

मृत्यू कशामुळे?

प्राथमिक अहवालानुसार शोएबचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे. मध्यंतरी उत्तर प्रदेशमधील नोएडामध्येही असाच प्रकार घडला होता. अगदी सहज क्रिकेट खेळता खेळता एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. मुंबईमधील एका स्थानिक स्पर्धेमध्येही क्रिकेट खेळताना बॉल डोक्याला लागून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. सध्या 20 वर्षीय शोएबच्या मृत्यू प्रकरणातही पोलीस तपास करत असल्याचं दिसत आहे.

क्रिकेटच्या मैदानामध्ये हल्ली प्राथमोपचारांबरोबरच अन्य आधुनिक सुविधाही उपलब्ध असतात. मात्र अचानक हृदयविकाराचा झटका किंवा काही त्रास झाला तर मदत मिळण्यापूर्वीच अनेकदा खेळाडू प्राण गमावतात. असे प्रकारही मागील काही काळापासून वाढल्याचं दिसत आहे.