भारताचा कोच होणं म्हणजे 1000 पटीने राजकारण...; 'या' खेळाडूच्या सल्ल्यानंतर जस्टिन लँगरने कोच होण्याचा विचार सोडला

Team India: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टीम इंडियाच्या नवीन मुख्य कोच पदासाठी काही मोठ्या नावांना विचारणा केली असल्याची माहिती आहे. या नावांमध्ये गौतम गंभीर, स्टीफन फ्लेमिंग, रिकी पाँटिंग, जस्टिन लँगर आणि महेला जयवर्धने यांचा समावेश आहे.

सुरभि जगदीश | Updated: May 24, 2024, 09:43 AM IST
भारताचा कोच होणं म्हणजे 1000 पटीने राजकारण...; 'या' खेळाडूच्या सल्ल्यानंतर जस्टिन लँगरने कोच होण्याचा विचार सोडला title=

Team India: सध्या टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड असून जूनपर्यंत त्यांचा कार्यकाळ संपणार आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआयने नव्या कोच पदासाठी अर्ज मागवले असल्याची माहिती आहे. मुख्य कोच पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मे आहे. टीम इंडियाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकाचा कार्यकाळ हा तिन्ही फॉरमॅटसाठी जुलै 2024 ते डिसेंबर 2027 या साडेतीन वर्षांचा असणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळासाठी (BCCI) टीम इंडियाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकाची निवड आता आव्हानात्मक बनल्याचं दिसून येतंय.

जस्टिन लँगर कोचपदासाठीच्या शर्यतीतून बाहेर

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टीम इंडियाच्या नवीन मुख्य कोच पदासाठी काही मोठ्या नावांना विचारणा केली असल्याची माहिती आहे. या नावांमध्ये गौतम गंभीर, स्टीफन फ्लेमिंग, रिकी पाँटिंग, जस्टिन लँगर आणि महेला जयवर्धने यांचा समावेश आहे. तर दुसरीकडे यामधून रिकी पाँटिंग आणि जस्टिन लँगर यांनी आपली नावं मागे घेतली आहेत. कुटुंबाला वेळ देत असल्याचं कारण देत पॉन्टिंगने नाव मागे घेतलं होतं. तर आता जस्टिन लँगरनेही भारतीय क्रिकेटपटू केएल राहुलच्या सल्ल्याने या शर्यतीतून माघार घेतलीये.

राहुलने जस्टिनला दिला खास सल्ला

जस्टिन लँगरने आयपीएल 2024 मध्ये लखनऊ सुपर जायंट्स टीमचे प्रशिक्षक आहे. यावेळी टीमचा कर्णधार केएल राहुलसोबत झालेल्या संभाषणाचा उल्लेख केला आहे. जस्टिन लँगरने खुलासा केला की, केएल राहुलने त्याला सांगितलं की भारतीय क्रिकेट टीमच्या कोचना ज्या 'राजकारण आणि दबावाचा' सामना करावा लागतो तो कोणत्याही आयपीएल प्रशिक्षकापेक्षा जवळजवळ हजारपटीने जास्त असतो.

टीम इंडियाच्या कोचिंगमध्ये 1000 पट पॉलिटीक्स

जस्टिन लँगरने बीबीसी स्टंप्डवर केलेल्या संभाषणात म्हटलं की, 'मला माहितीये की, ही एक मोठी भूमिका आहे. चार वर्षे ऑस्ट्रेलियन टीमसोबत काम केल्यानंतर थकवा येतो. मी केएल राहुलशी बोलत होतो आणि तो म्हणाला तुम्हाला माहिती आहे, जर तुम्हाला वाटत असेल की आयपीएल टीममध्ये दबाव आणि राजकारण आहे, तर त्याचा हजाराने गुणाकार करा, तेच आहे टीम इंडियाचं कोचिंग. मला वाटतं की तो चांगला सल्ला होता.

प्रत्येक फॉर्मेटसाठी वेळ कोच ठेवणार BCCI?

असंही म्हटलं जातंय की, टीम इंडियामध्ये नवीन कोचिंग पॅटर्न लागू केला जाऊ शकतो. रिपोर्टनुसार, बीसीसीआय प्रत्येक फॉरमॅटसाठी स्वतंत्र कोच ठेवण्याचा विचार करतोय. इंग्लंड टीममध्ये देखील ही पद्धत असून पाकिस्तान क्रिकेट बोर्डही हा नियम पाळतोय. त्यामुळे आता ही पद्धत टीम इंडियात येऊ शकते.