55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) चित्रपट निर्माते राहुल रवैल यांनी बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरची मुलाखत घेतली. इफ्फीमध्ये रणबीर कपूरचे आजोबा, अभिनेते राज कपूर यांना 14 डिसेंबर रोजी त्यांच्या 100 व्या जयंतीपूर्वी सन्मानित करण्यात आले. मुलाखतीदरम्यान, रणबीर कपूरने आपल्या आजोबांचा वारसा, तसंच त्यांच्याकडून संपूर्ण बॉलिवूडसाठी आयोजित केलेल्या होळी पार्टीच्या आठवणीही सांगितल्या.
रणबीर कपूरने यावेळी या होळी पार्टी आपल्यासाठी फारच भितीदायक होत्या असं सांगितलं. "मी तेव्हा फार तरुण होतो, त्यामुळे माझ्यासाठी ते फार भितीदायक वातावरण होतं. प्रत्येकजण काळ्या किंवा इतर रंगात रंगलेले होते. सर्वांना उचलून ट्रकमध्ये फेकलं जात आहे. कदाचित काही चांगल्या आठवणीही असू शकतात," असं रणबीर कपूर म्हणाला आणि राहुल रवैल यांच्याकडे हात दाखवला. त्यावर ते उत्तर देत म्हणाले, "तू त्या बाबतीत बरोबर आहेस. सर्वजण काळ्या, निळ्या रंगात असायचे. दिवसभर हे सेलिब्रेशन सुरु असायचं".
पुढे रणबीर कपूर म्हणाला की, "जे मी ऐकलं आहे, त्यानुसार फक्त अभिनेते, अभिनेत्री नाही तर इंडस्ट्रीतील सर्वजण तिथे असायचे. कॅमेरा, प्रोडक्शनमध्ये काम करणारेही या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होत असत". राहुल रवैल यांनी यावेळी या पार्टी बंद का झाल्या याचं कारण सांगितलं. "त्या पार्टी बंद झाल्या कारण तिथे फारच गर्दी होत होती. कोणीही तिथे येत असल्याने अनियंत्रित होत होतं," अशी माहिती त्यांनी दिली.
RK स्टुडिओमधील राज कपूर यांच्या होळीच्या पार्ट्या हा रंगांचा सण साजरा करण्यासाठी संपूर्ण चित्रपटसृष्टीला एकत्र आणणारा क्षण असायचा. ही पार्टी उत्सवाची भव्यता, दारू आणि रंगांसाठी ओळखली जात होती. अमिताभ बच्चन, नर्गिस, राजेंद्र कुमार, प्रेमनाथपासून ते निरुपा रॉयपर्यंत अनेक सेलिब्रिटी या पार्टीला हजेरी लावत असत.
रणबीर कपूर 'अॅनिमल' चित्रपटात अखेरचा दिसला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. सध्या तो संजय लीला भन्साळी याच्या 'लव्ह अँड वॉर' चित्रपटासाठी तयारी करत आहे. यामध्ये त्याच्यासह आलिया भट्ट आणि विकी कौशल दिसणार आहेत. जानेवारी 2024 मध्ये चित्रपटाची घोषणा करण्यात आली. याशिवाय तो नितेश तिवारी यांच्या 'रामायण' चित्रपटातही दिसणार आहे. यामध्ये त्याच्यासह साई पल्लवी मुख्य भूमिकेत आहे.