Dasara 2024 : दसऱ्याला 'सोनं' म्हणून आपट्याची पानंच का लुटतात? धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

Dasara 2024 : सोनं घ्या आणि सोन्यासारखं राहा, असं म्हणत दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पानं ही सोनं म्हणून का लुटतात यामागील कारणं तुम्हाला माहितीये का?

नेहा चौधरी | Updated: Oct 9, 2024, 04:32 PM IST
Dasara 2024 : दसऱ्याला 'सोनं' म्हणून आपट्याची पानंच का लुटतात? धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या title=
Why are apata leaves exchanged as gold on Dasara Know the religious and significance vijayadashami 2024

Dasara 2024 : दसरा हा सण भारतात सर्वत्र साजरा केला जातो. तसं पाहिलं तर हा सण फार प्राचीन काळापासून साजरा केला जातो. सुरूवातीला तो कृषीमहोत्सव होता. पावसाळ्यात शेतकरी धान्य पेरतात, ते पीक तयार झाल्यावर घरात आणण्याच्या वेळी हा सण साजरा केला जात होता. साडेतीन मुहूर्तातील हा एक मुहूर्त भारतात मोठा सण मानतात.  (Why are apata leaves exchanged as gold on Dasara Know the religious and significance vijayadashami 2024) 

दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा, असा हा सण आहे. आज आपण आपट्याची पाने सोनं म्हणून एकमेकांना देतो. हे पान नीट पहाल तर ते हृदयाच्या आकाराचे असतं. त्याचे दोन भाग असतात. पण ते एकमेकांना जोडलेले असतात. जणू ते सांगत असतात दोन हृदय एकमेकांशी प्रेमाने जोडा, प्रेमाने एकत्र राहा. पानांच्या रूपाने आपण आपली मनं जुळवतो. सोन्याच्या श्रीमंतीपेक्षा हृदयाची श्रीमंती अधिक मोलाची असतं. आपल्या प्रत्येक सणामागे एक कारण आहे. 

दसऱ्याला 'सोनं' म्हणून आपट्याची पानंच का लुटतात? 

याबद्दल एक आख्यायिका सांगण्यात आलीय. रघुराजा राज्य करत असतानाच्या कौत्स नावाचा एक ब्राह्मण होता. कोत्स हा वरतंतु ऋषींचा शिष्य होता. कोत्साला आपल्या गुरुला दक्षिणा द्यायची होती. शिष्याच्या प्रगतीवरच समाधानी असणाऱ्या वरतंतु ऋषींनी प्रथम गुरुदक्षिणा घेण्यास नकार दिला, पण शिष्याच्या आग्रहाखातर अखेरीस त्यांनी सांगितले की, मला एकाच स्रोताकडून मिळालेल्या 14 कोटी सुवर्णमुद्रा अर्पण कर. कौत्स हा गरीब होता. त्याला गुरुंना गुरुदक्षिणा कशी द्यावी हे समजत नव्हतं. अखेर त्याने रघुराजाकडे जाऊन मदत मागितली. पण, रघुराजाने त्याची सर्व संपत्ती यज्ञात दान केल्याने त्याला कौत्साची मदत करता येत नव्हती. पण, दारी आलेल्या याचकाला रिकाम्या हाती पाठवणे रघुराजाच्या मनाला पटत नव्हतं. म्हणून त्याने ठरवले की, कुबेरावर हल्ला करून त्याची संपत्ती मिळवायची आणि कोत्साला दान करायची.

 

हेसुद्धा वाचा - Navratri Ashtami Date 2024 : यंदाच्या नवरात्रीत अष्टमी आणि नवमी एकत्र? कन्या पूजा कधी? तिथी, शुभ मुहूर्त जाणून घ्या

 

कुबेराला हे समजताच त्याने राजाला निरोप पाठवला की, 'तो स्वखुशीनेच त्याची मागणी मान्य करेल आणि कोत्साला सुवर्णमुद्रा मिळतील.' विजयादशमी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी कुबेराने सुवर्णमुद्रांचा वर्षाव केला. कोत्साने गुरुदेवांना हव्या होत्या तितक्याच 14 कोटी मुद्रा घेतल्या आणि गुरुदक्षिणा म्हणून दिल्या. उरलेल्या सुवर्णमुद्रा पानासह तोडून सर्वांना वाटल्या. ज्या झाडावर सुवर्णमुद्रांचा वर्षाव झाला ते झाड होते आपट्याचं. या नंतर हिरण्याचं (सोनं) पावित्र्य त्या आपट्याच्या पानांना लाभलं म्हणून या पानांना हिरण्यगर्भा असंही म्हणतात. तेव्हापासून आपट्याचे पान सोनं म्हणून लुटण्याची परंपरा सुरू झाली. 

वैज्ञानिक कारण ?

या झाडाबद्दल अनेक फायदे सांगण्यात आलेय. या झाडावर अनेक कीटक, फुलपाखरं उपजीविका करतात त्यामुळं पर्यावरणीयदृष्ट्या हे झाड अतिशय महत्त्वाचं आहे. त्याशिवाय मानवासाठीही ते उपयुक्त झाड आहे. या झाडापासून डिंग, धागे, टॅनिन मिळतं. आपट्याच्या लाकडाचाही पूर्वी वापर होत असे तसंच पानांचा बिडी बनवण्यासाठीही वापर केला जातो.

आयुर्वेदातही आपट्याचा उल्लेख आहे. आपट्याच्या सालीचा रस पचनसंस्थेच्या रोगांवर वापरला जायचा, मुतखडा विकारात औषधामध्ये आपट्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जायचा. तर याची पानं कफ आणि पित्त दोषांवर गुणकारी असल्याचं सांगितलं जातं.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)