Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य उत्तरायण होऊन मकर राशीत प्रवेश करतो. वैदिक ज्योतिषशास्त्र आणि हिंदू धर्मानुसार जेव्हा सूर्य मकर राशीत गोचर करतो त्यादिवशी मकर संक्रांत साजरी करण्यात येते. साधारण सूर्य 14 जानेवारीला मकर राशीत प्रवेश करतो. मात्र गेल्या दोन वर्षांपासून मकर संक्रांत ही 15 जानेवारीला साजरी करण्यात येत आहे. त्यामुळे यंदा 2024 ला मकर संक्रांत 14 की 15 जानेवारी नेमकी कधी साजरी करायची आहे, जाणून घ्या संपूर्ण माहिती. (When is Makar Sankranti 14th or 15th January know date and time pujan vidhi muhurt and sugad puja sahitya Complete information)
मकर संक्रांत ही सूर्य संक्रमणचा उत्सव असतो. याचा अर्थ सूर्यदेव जेव्हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवशी मकर संक्रांत साजरी करण्यात येते. मिथिला पंचांगानुसार 15 जानेवारीला सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी, तर काशी पंचांगानुसार सकाळी 8 वाजून 42 मिनिटांनी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे. या पंचांगानुसार यंदाही तिसऱ्या वर्षी मकर संक्रांत ही 15 जानेवारीला साजरी करण्यात येणार आहे.
मकर संक्रांतीला तब्बल 77 वर्षांनी दुर्मिळ योग जुळून आला आहे. यंदा संक्रांतीला रात्री 11:11 पर्यंत वरियान योग आहे. त्यासोबत रवि योग हा सकाळी 7:15 ते 8:07 पर्यंत आहे. या शुभ मुहूर्तावर केलेल्या पूजेचे शुभ फळ मिळतं.
सूर्यदेवासह छाया देवीही मकर संक्रांतीत येत असते. दरवर्षी देवी वेगवगेळ्या वस्त्रात आणि वाहनावर येत असते. यंदा देवी घोडा आणि उपवाहन सिंहीणवर असणार आहे. तर देवीचं वस्त्र हे काळ असणार आहे.
मकर संक्रांत ही भारतात वेगवेगळ्या नावाने साजरी करण्यात येते. तामिळनाडूसह तेलंगण, आंध्रप्रदेश आणि आजूबाजूच्या इतर राज्यांमध्ये पोंगल नावाने हा सण साजरा करण्यात येतो. केरळमध्ये याला मकर विलक्कू म्हटलं जातं. पंजाबमध्ये मकर संक्रांती माघी किंवा लोहरी तर गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेश उत्तरायण असं म्हटलं जातं. गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशातही पंतंग उत्सव होतो. साधारण मकर संक्रांतीला पवित्र नदीत स्नान केलं जातं. त्यामुळे नदीत जाणं शक्य नसेल तर घरात गंगाजल घालून आंघोळ करा. त्यानंतर पिवळे कपडे घालून सूर्यदेवाला जल आणि तिळ अर्पण करा. तसंच सूर्य चालिसाचे पठणही करा. यादिवशी दान केल्यास पुण्य मिळतं असं म्हणतात.
मकर संक्रांतीला सुगड पूजेसाठी मोठे काळे सुगड, त्याहून छोटे लाल किंवा तांबड्या रंगाचे सुगड हे पाच सुगड, हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरं, तिळगुळ, हळद, कुंकू, गव्हाच्या लोंब्या आणि फुलं, पाट किंवा चौरंग, लाल रंगाचा कपडा, दिवा, रांगोळी, तांदूळ किंवा गहू, तिळगूळ-लाडू तयार करा.
सुगड पूजा ठिकाण स्वच्छ करुन तिथे पाट किंवा चौरंग मांडा. त्याभोवती सुंदर रांगोळी रेखाटा. चौरंगावर लाल रंगाचं वस्त्र घालून त्यावर पाच ठिकाणी मुठीभर तांदूळ किंवा गहू घाला. आता पाच सुगडला पाच ठिकाणी उभं हळदी कुंकू उभे लावून ते गहू किंवा तांदळावर ठेवा. त्यानंतर सुगडमध्ये एकएक करुन हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरे, तीळगूळ, हळद-कुंकू, गव्हाच्या ओंब्या टाका. काळ्या रंगाचं मोठं सुगड खाली त्यावर लाल रंगाचं सुगड अशी त्याची मांडणी करा. सुगडावर अक्षता, फुलं, हळद, कुंकू वाहून धूप, दीप लावून पूजा करा. सुगड पूजेला तिळाचे लाडू आणि हलव्याचा नैवेद्य दाखवा. काही ठिकाणी हे सुगड महिला नंतर पाच जणींना वाण म्हणून देतात.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)