Shani Gochar In Kumbh Rashi: शनि आपल्या राशीला येतो म्हंटलं की चांगल्या चांगल्यांना घाम फुटतो. शनि हा सर्वात मंद गतीने भ्रमण करणार ग्रह आहे. प्रत्येक राशीतील गोचर कालावधी हा अडीच वर्षांचा असतो. त्या दरम्यान शनि वक्री किंवा अस्ताला जात असतो. याशिवाय काही ग्रह एकाच राशीत आल्याने शुभ-अशुभ युती तयार होत असते. गेल्या वर्षी म्हणजेच 29 एप्रिल 2022 रोजी दुपारी 12 वाजून 17 मिनिटांनी शनिदेवांनी कुंभ राशीत प्रवेश केला होता. त्यामुळे काही राशींना दिलासा मिळाला होता. मात्र 12 जुलै 2022 रोजी वक्री अवस्थेत गेल्याने मकर राशीत पुन्हा स्थिरावला. यामुळे तात्पुरता दिलासा मिळाल्याने पुन्हा एकदा शनिच्या छत्रछायेखाली यावं लागलं. त्यानंतर 23 ऑक्टोबर 2022 सकाळी 9 वाजून 37 मिनिटांनी मकर राशीत मार्गस्थ झाला. आता शनि शेवटच्या टप्प्यात असून 17 जानेवारी 2023 रोजी कुंभ राशीत स्थित होणार आहे. या स्थितीमुळे काही राशींची साडेसाती, अडीचकी संपणार आहे. तर काही राशींना सुरु होणार आहे.
धनु राशीची साडेसाती संपणार आहे. तर तूळ, मिथुन राशीची अडीचकीतून मुक्तता होणार आहे. मकर राशीला साडेसातीचा शेवटचा टप्पा, कुंभ राशीला मधली अडीच वर्षे आणि मीन राशीला साडेसातीचा पहिला टप्पा सुरु होणार आहे. त्याचबरोबर कर्क आणि वृश्चिक राशीचे जात शनि अडीचकीच्या छत्रछायेखाली येणार आहे.
शनिदेव राशीत आल्यानंतर बऱ्याच घडामोडी वेगाने घडतात. 17 जानेवारी शनिदेव आपला प्रभाव दाखवतीलच. पण दरम्यान 5 फेब्रुवारी 2023 रोजी शनिदेव सूर्याजवळ येणार असल्याने अस्ताला जातील. या स्थितीत ते 32 दिवस असणार आहेत. 9 मार्च 2023 रोजी शनिदेवांना पुन्हा तेज प्राप्त होईल. अस्त काळात संकटांचा प्रभाव कमी होईल. पण त्यानंतर पुन्हा एकदा अनुभव येतील, असं ज्योतिषशास्त्रांचं म्हणणं आहे.
बातमी वाचा- Durva: गणपतीला प्रिय असलेल्या दुर्वाचे प्रभावी तोडगे, ज्योतिषशास्त्रानुसार उपाय जाणून घ्या
शनिदेव 17 जून 2023 रोजी शनि पुन्हा एकदा कुंभ राशीत वक्री होणार आहे. या स्थितीत शनिदेव 140 दिवस असणार आहेत. त्यानंतर 4 नोव्हेंबर 2023 रोजी मार्गस्थ होणार आहे. या स्थितीमुळे मकर, कुंभ, मीन, कर्क आणि वृश्चिक राशीला तात्पुरता दिलासा मिळणार आहे. शनिदेव हे ग्रहमंडळात न्यायदेवतेची भूमिका बजावतात. त्यामुळे शनिदेव वक्री अवस्थेत चुका सुधारण्याची संधी देतील असंच म्हणावं लागेल.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)