Diwali Padwa Shubh Muhurat : देशभरात दिवाळीचा उत्साह मोठ्या थाट्यामाट्यात साजरा होतोय. लक्ष्मीपूजनानंतर आज गोवर्धन पूजा आणि बलिप्रतिपदा आहे. कार्तिक शुक्ल प्रतिपदेचा हा दिवस बलिप्रतिपदा म्हणून ओळखला जातो. त्यासोबत आज दिवाळीचा पाडवा असून पती पत्नीमधील गोड नाताचा हा सण आहे. तर व्यापारी वर्गासाठी नववर्षाची सुरुवात असते. त्यामुळे याला व्यापारी पाडवा असंही म्हणतात.
दिवाळी पाडव्याला पत्नीने पतीस अभ्यंगस्नान घालावं आणि औक्षण केलं जातं. त्यांना उदंड आयुष्य लाभावं यासाठी देवाकडे प्रार्थना करते. या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. नवरा आपल्या घरातील लक्ष्मीला आजच्या दिवशी भेटवस्तू देतो.
सत्यवान सावित्रीची कथा सर्वांना माहितीच आहे. या दिवशी महासती पातिव्रत्य धर्माचं स्मरण म्हणून दिवाळी पाडवा साजरा करण्यात येतो. पौराणिक कथेनुसार, असुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू होता. राक्षस कुळामध्ये जन्म घेऊन देखील चारित्र्यवान, विनयशील, प्रजेच्या हितासाठी दक्ष राजा म्हणून बळी राजा ओळखला जात होता. राजा बलीने आपल्या शक्तीच्या प्रभावाने देवांचाही पराभव केल्याचं म्हटलं जातं. बळी राजा हा अतिशय दानशूर होता. परंतु त्याला अहंकाराचा वारा लागल्याने तो अहंकारापासून दूर राहू शकला नाही. अहंकारामुळे माणसाची अधोगती होते. तसंच राजाचं सुद्धा तेच झाले आणि त्यामुळे भगवान श्रीहरी विष्णूंनी वामनावतार म्हणून बटूचं रूप घेतलं आणि तो बळी राजाकडे दान मागायला गेला.
यावेळी बळी राजाने एक यज्ञ केला आणि या यज्ञानंतर दान देण्याची प्रथा होती. ते दान घेण्याच्या निमित्ताने भगवान विष्णूंनी वामनावतार धारण केला. बटू वेशात ते बळी राजासमोर उभे राहिले आणि त्यांनी तीन पावलं जमीन मागितली. यावेळी वचनाला जागून बळी राजाने हे दान देण्याची तयारी दाखविली, तेव्हा वामनावतारी विष्णूंनी प्रचंड रूप धारण करीत स्वर्ग आणि पृथ्वी लोक व्यापलं. तिसरं पाऊल ठेवण्यास जागा शिल्लक न राहिल्याने वचनपूर्तीसाठी बळी राजाने आपलं डोके पुढे केलं. तीन पावलांमध्ये भगवान विष्णूंनी बळी राजाकडून सर्व काही काढून घेतलं. यावेळी बळी राजाच्या मनाचा उदारपणा बघून भगवान श्रीहरी विष्णू बळी राजावर प्रसन्न झालं आणि त्याला त्यांनी पाताळाचं राज्य देऊ केलं.
या संपूर्ण प्रसंगामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची लीला पाहून अर्थात आपल्या पतीची लीला आणि औदार्य पाहून लक्ष्मी प्रसन्न झाली. यावेळी तिने भगवान श्रीहरी विष्णूंना ओवाळलं. भगवान श्रीहरी विष्णूंनीसुद्धा माता लक्ष्मीला ओवाळणी दिली आणि त्या दिवसापासून पत्नी पतीचं औक्षण करतं. तेव्हापासून या दिवस पाडवा साजरा केला जातो.
दिवाळी पाडवा शुभ मुहूर्त - दुपारी 3 वाजून 12 मिनिटांपासून ते 4 वाजून 36 मिनिटांपर्यंत लाभ मुहूर्त
पतीला ओवाळण्यासाठी संध्याकाळी 5 ते रात्री 8 पर्यंत मुहूर्त असणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)