न्यू यॉर्क: येणाऱ्या नव्या वर्षात मागील वर्षाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी फेसबूकनं आपल्या युजर्सला ‘इअर इन रिव्ह्यू’ची भेट दिली होती. मात्र या भेटीनं मनस्ताप घडवला असल्याची भावना युजर्समध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळं फेसबुकनं आपल्या युजर्सची माफी मागितली आहे.
‘इअर इन रिव्ह्यू’मध्ये सुखद गोष्टींसोबतच काही दुखद गोष्टींचे फोटोदेखील पाहायला मिळाले. यामुळं दुखावलेल्या युजर्सची फेसबूकनं माफी मागितली आहे.
फेसबूकनं आपल्या सर्व युजर्ससाठी ‘इयर इन रिव्ह्यू’ व्हिडिओ तयार केला आहे. यामध्ये युजर्सच्या आठवणी ताज्या करण्यासाठी काही क्षणचित्रांचा समावेश केलेला आहे. मात्र या चित्रांमध्ये काही मृत व्यक्तींचे फोटोदेखील दिसत असल्यानं काही लोकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
अनेकांनी फेसबूकवरच याबाबत संताप व्यक्त केला आहे. याची दखल घेत फेसबूकचे प्रॉडक्ट मॅनेजर जोनाथन घेलर यांनी याबाबत माफी मागितली आहे. अनेक लोकांसाठी ‘इयर इन रिव्ह्यू’ ही भेट चांगली वाटली असली तरी काही लोकांना आम्ही दुख: दिलं असल्याची आमची भावना झाली असल्याचंही घेलर यांनी स्पष्ट केलं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.