मुंबई: जग जोडणाऱ्या फेसबुकसारख्या सोशल नेटवर्क साइट्सनं मुंबई आयआयटीच्या विद्यार्थ्यांना चक्क कोट्यवधी पगाराच्या नोकऱ्या देऊ केल्या आहेत. सोमवारी झालेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये फेसबुकनं मुंबई आयआयटीच्या पाच विद्यार्थ्यांची निवड केली आहे.
दीपाली अडलखा, वेदरत्न दीक्षित, रोहन दास, आस्था अग्रवाल आणि राहुल सिंघल यांचा यात समावेश आहे. विशेष म्हणजे दीपाली अडलखाला फेसबुकनं चक्क १ कोटी ४२ लाखांची नोकरी देऊ केली आहे.
आयआयटीकडून मिळालेल्या माहितीनुसार, फेसबुक, गुगल, मायक्रोसॉफ्ट, बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप, ब्लॅकस्टोन, सॅमसंग, ओरॅकल, लिंक्डइन, मॉर्गन स्टॅन्ले आणि शेलसारख्या नामांकित कंपन्यांनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. पहाटे चार वाजल्यापासून मध्यरात्री दोन वाजेपर्यंत तब्बल ३७ कंपन्यांनी आयआयटीच्या विद्यार्थ्यांमधील टॉपर्सच्या मुलाखती घेतल्या.
महत्त्वाचे म्हणजे गेल्या वर्षी पहिल्या दिवशी ४०० विद्यार्थ्यांच्या मुलाखती झाल्या होत्या. या वर्षी मुलाखतींचा आकडा तब्बल ५५० वर पोहोचला. विद्यार्थी वर्गाला प्रत्येकी ८० अर्ज करण्याची मर्यादा घालण्यात आली होती. परिणामी प्रत्येक कंपनीकडे दाखल होणाऱ्या अर्जांची संख्या घटली होती आणि ती ८०० हून ३०० वर आली होती. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेणाऱ्या कंपन्यांमध्ये आंतरराष्ट्रीय कंपन्यांची संख्या अधिक आहे.
मुंबई आयआयटीमधून सर्वाधिक रकमेच्या पगाराची नोकरी पटकावणाऱ्या दीपाली अडलखा हिच्याशी संपर्क साधला असता तिने सांगितले की, माझा पगार १ कोटी ४२ लाख असला तरी बेसिक पेमेंट ६५ लाख एवढे आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.