www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर आता पाच महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीत सत्तेवर येण्याचे वेध महायुतीला लागलेत. मात्र सत्तेच्या या सारीपाटात महायुतीमधील कुरघोडीचे राजकारणही आतापासूनच सुरू झालं आहे.
मुंबई आणि ठाण्यात विधानसभेच्या जागा वाढवून देण्याची मागणी भाजपनं केलीय. याबाबत भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी दुजोरा दिला असून ही बाब पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवण्यात येईल. तसंच याबाबत महायुतीतील वरिष्ठ नते निर्णय घेतील असं शेलार म्हणाले. मुंबईत मिळालेलं यश हे मोदी लाटेमुळे मिळालं असल्याचा दावा करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी जागा वाढवण्याची मागणी केली आहे.
नरेंद्र मोदी फॅक्टरमुळं लोकसभा निवडणुकीत महायुतीने राज्यातील 48 पैकी 42 जागा जिंकून घवघवीत यश मिळवलयं. राज्यात महायुतीचा आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा विजय झालाय. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं 26 जागा लढवल्या होत्या, तर शिवसेनेनं 22 जागा. मात्र, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीत नवे तीन पार्टनर वाढल्यानं भाजपाने 24 जागा लढवून आपल्या वाट्याच्या दोन जागा राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिल्या, तर शिवसेनेनं 22 पैकी आपल्या वाट्याची एक जागा रामदास आठवलेंच्या रिपाईला दिली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने 24 पैकी 23 जागा जिंकल्या आहेत तर शिवसेनेनं 21 पैकी 18...
नरेंद्र मोदी या महत्वाच्या फॅक्टरमुळं घवघवीत यश मिळाल्यानंतर महायुतीला आता राज्यातील विधानसभा काबिज करण्याचे वेध लागलेत. मात्र, सत्तेच्या या सारीपाटात शिवसेना-भाजपा युतीमध्ये आतापासूनच कुरघोडी सुरू झालीयं. ही कुरघोडी सुरू आहे ती मुख्यमंत्रीपदावरून... भाजपाची राज्यातील ताकद वाढल्याने भाजपाचे राज्यातील नेते मुख्यमंत्रीपदावर दावा सांगत आहेत. भाजपामुळेच शिवसेनेला राज्यात नवसंजवनी मिळाल्याचा दावाही भाजपाचे नेते खाजगीत करताना दिसतायत. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता शिवसेनाही आक्रमक झाली असून त्यांनी थेट मुख्यमंत्रीपदावर दावा केला आहे. खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, असं सांगूनही टाकलंय.
राज्यातील 2009च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने 117 जागा लढवून 46 जागा जिंकल्या होत्या आणि शिवसेनेने 171 जागा लढवून 44 जागा जिंकल्या होत्या. मात्र, यावेळी लोकसभा निवडणुकीत मिळालेलं यश लक्षात घेता भाजपाने आतापासूनच शिवसेनेवर दबाव टाकून जागा वाढवून मागण्याची तयारी सुरू केलीयं. त्यात महायुतीमध्ये सामील झालेले रिपाई, शिवसंग्राम, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय जनता पक्ष यांनाही विधानसभेला जागा द्याव्या लागणार आहेत. मात्र, शिवसेना जागा वाटपातला आपला मोठा वाटा निश्चितच कमी होऊ देणार नाही, हे शिवसेना कार्याध्यक्षांनी स्पष्ट केलं आहे. राज्यात शिवसेना-भाजपामध्ये जागा वाटप आणि मुख्यमंत्रीपदावरून कुरघोडी सुरू असतानाच शिवसेनेनं आता नरेंद्र मोदी सरकारवर दबाव आणणंही सुरू केलं आहे.
रत्नागिरी येथील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प स्थलांतरीत करावा, राज्यातील गारपीटग्रस्तांना दिलासा देण्यासाठी शेतकऱ्यांचे कर्ज माफ व्हावं, मुंबई आणि महाराष्ट्रातून जितका कर केंद्राच्या तिजोरीत जमा होतो, त्या प्रमाणात राज्याला वाटा मिळावा... अशा मागण्या घेऊन आतापासूनच शिवसेनेनं दबाव वाढवणं सुरू केलंय.
मुख्यमंत्रीपद आणि जागा वाटपाच्या मुद्यावर शिवसेना-भाजपामध्ये सुरू असलेली कुरघोडी पुढे आणखी वाढण्याची चिन्हं आहेत. वेगळ्या विदर्भाच्या प्रश्नावरही दोन्ही पक्षामध्ये मतभेद होऊ शकतात. वेगळ्या विदर्भाला शिवसेनेचा विरोध आहे. एकंदर या दोन्ही पक्षातील दरी वाढू शकते. मात्र, असं असलं तरी सत्तेचा सोपान गाठण्यासाठी हे दोन्ही पक्ष एकत्रच निवडणुकीला सामोरं जाणार हे निश्चित... अर्थात दोन्ही पक्षातील नेत्यांमधील मतभेद मिटले तरी ‘मन’भेद मात्र कायम राहतील असं सध्या तरी चित्र आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.