www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
नाशिक जिल्ह्यातील राजकीय पुढारी सध्या कुठलाही छोट्यातल्या छोट्या धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाला हजेरी लावत आहेत. गेल्या आठ दिवसांपासून लोकांमध्ये सहभागी होण्याचा सिलसिला आजही सुरु आहे. साहजिकच निवडणुका आल्यानं सर्वाना देवाचा, महापुरुषांचा धावा करायचाय. देवावर श्रद्धा असेलही मात्र त्या देवाच्या पूजेसाठी दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये राजकारणी आपला मतदार शोधात आहेत.
नाशिक ही मुळातच मंदिरांची नगरी... त्यातच निवडणुका तोंडावर असल्यानं सगळेच सण-उत्सव राजकारण्यांना पर्वणीच ठरत आहेत. याची सुरुवात गेल्या मंगळवारी रामनवमीपासून झाली. नाशिकच्या काळाराम मंदिरात राम जन्मोत्सव सोहळ्याचे नगरे वाजू लागले. तेव्हाच नाशिक लोकसभा मतदार संघातले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार छगन भुजबळ कार्यकर्त्यांच्या ताफ्यासह मंदिरात दाखल झाले. भुजबळ गाभाऱ्यात पोहचतात, तोच मनसेचे उमेदवार प्रदीप पवारही रामरायाच्या दर्शनासाठी आले. त्यापाठोपाठ अकरा तारखेला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती कार्यक्रमांना नेत्यांनी हजेरी लावली.
एव्हढंच काय, कामदा एकादशी निमित्तानं निघणाऱ्या पेशवेकालीन श्रीराम रथोत्सवामध्येही छगन भुजबळ, शिवसेनचे हेमंत गोडसे सहभागी झाले. रविवारी १३ एप्रिलला सकाळी महावीर जयंतीच्या मिरवणुकीतही हाच अनुभव आला. सकळी महावीर जयंतीला उपस्थिती लावून मध्यरात्री १२ वाजण्याच्या ठोक्यालाही तितकेच ताजेतवाने असल्याचं दाखवत बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी सगळे उमेदवार शिवाजी रोडवर जमा झाले.
नाशिकचे मतदार मात्र या सगळ्यावर बारकाईनं लक्ष ठेऊन आहेत. गेल्या पाच वर्षांत ज्यांचं दर्शन अभावानंच झालं, ती मंडळी आता सगळ्या उत्सवांमध्ये मिरवताना दिसतायत.
जयंती, पुण्यतिथी आणि उत्सवांच्या निमित्ताने मतदारांना आकर्षित करण्याची एकही संधी राजकरणी सोडत नाहीत. कुणी घड्याळाची अचूक वेळ साधत उपस्थिती दाखवतंय तर कुणी इंजिनाचा वेग पकडत मतदारांच्या धावत्या भेटी गाठी घेतंय. अर्थात या सर्व रामायणानंतर नाशिक लोकसभा मतदारसंघातले नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याचं शिवधनुष्य कुणाच्या खांद्यावर दिसणार यासाठी १६ मे पर्यंत वाट बघावी लागणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.