www.24taas.com,झी मीडिया,कुडाळ,
काँग्रेसचे नेते नारायरण राणे यांच्याच बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली. सात वर्षांनंतर होत असलेली जाहीर सभा. समोर भगवा कोकणी जनसागर. कोकणी माणसला फसवलत तर त्याची सटकेल, हेही लक्षात घ्या. विकासाच्या आड येऊ नका, नाहीतर गाठ शिवसेनेची आहेत, असे सांगत उपस्थित जनसागरासमोर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अक्षरश: नतमस्तक झाले. यावेळी शिवसेना झिंदाबादच्या घोषणा दुमदुमल्यात.
सर्वांनाच आठवली १९९५ साली मालवणच्या बोर्डिंग ग्राऊंडवर झालेली शिवसेनाप्रमुखांची सभा. कुठेही न झुकणारं मस्तक त्यावेळी कोकणी माणसासमोर झुकलं होतं. शिवसेनाप्रमुखांनी तेव्हा नतमस्तक होत कोकणच्या अलोट प्रेमाचे आभार मानले होते आणि हेच प्रेम कायम ठेवा असे आवाहनही केले होते. आजही तीच परंपरा पुढे नेत उद्धव ठाकरे नतमस्तक झाले.
विकासाच्या नावाखाली कोकणी माणसाला देशोधडीला लावणार्या सिंधुदुर्गातील तथाकथित ‘दादां’ना आणि काँग्रेसला उद्धव ठाकरे यांनी रोखठोक आव्हान दिले. हिंमत असेल तर दादागिरी करून दाखवा, तुमच्या दादागिरीला कुत्रंही भीक घालणार नाही. तुमचे शंभर अपराध भरलेत. आता कोकणी माणसाची सटकलीय... तुमच्या ‘दादा’गिरीचा तो कायमचा नायनाट करून टाकेल, असे स्पष्ट बजावले.
उद्धव ठाकरे यांनी २०१४च्या निवडणुकीत जुलमी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्तेतून उखडून टाकत शिवशाहीचे सरकार आणण्याची शपथ घेतली तेव्हा उपस्थितांनी एकीची, निर्धाराची वज्रमूठ उंचावून त्यांना जोरदार प्रतिसाद दिला.
उद्धव ठाकरे म्हणाले, हा समोरचा भगवा महासागर पाहून मी नि:शब्द झालो आहे. त्याचे दर्शन घेत राहावे, असेच वाटते. हे हृदयापासून निर्माण झालेले प्रेम आहे आणि याच जोरावर मी शिवधनुष्य उचलणार आहे. ही भगवी लाट मला विधानसभेत, लोकसभेत दाखविणार की नाही, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला तेव्हा ‘उद्धव ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’च्या घोषणा देण्यात आल्या.