www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
शिवसेनेचं वर्चस्व असलेल्या २४ व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेवर शिवसेनेच्या बड्या नेत्यांनी बहिष्कार टाकल्याचे चित्र आज दिसून आलं. बड्या नेत्यांनी पाठ दाखल्याने उद्घाटनाच्या कार्यक्रमाला महायुतीच्या घटक पक्षातील रिपाइंचे राष्टीय अध्यक्ष रामदास आठवले यांना ऐन वेळी बोलवून त्यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन करण्याची वेळ सेनेवर आली.
ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा ही ठाण्याची शान म्हणून ओळखली जातेय. मात्र शिवसेनेच्या या बालेकिल्ल्यातच या स्पर्धेला सत्ताधा-यांनीच पाठ दाखवल्याच चित्र पहायला मिळालं.
सुमारे ५० लाख रुपये खर्च करुन या स्पर्धेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे उपस्थित राहणार असल्याचा दावा दोन दिवसांपूर्वी महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी केला होता.पण त्यांचा हा दावा सपशेल फोल ठरला. उद्धव ठाकरे हे त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार नाशिकच्या दौ-यावर असल्याने त्यांनी या स्पर्धेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास नकार दिला. सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार या कार्यक्रमाचं निमंत्रण उद्धव ठाकरे यांना दोन दिवसापूर्वीच मिळालं होतं..मात्र त्यांचा नाशिक दौरा आधीच ठरला होता. महापौर हरिश्चंद्र पाटील यांना माहिती असतानाही त्यांनी उद्धव ठाकरे हे उपस्थित राहण्याची घोषणा करून या स्पर्धेला शिवसेनिकांची गर्दी जमविण्याचा प्रयत्न केला. त्यातही ऎन वेळी उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थतीत शिवसेनेच्या एकाही बड्या नेत्याने या स्पर्धेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला हजर राहण्यास नकार दिल्याने महापौरांची चांगलीच गोची झाली. अखेर महापौरांना महायुतीचे नेते आठवले यांची आठवण झाली.
विशेष म्हणजे प्रमुख नेत्यांनी एकीकडे या स्पर्धेकडे पाठ फिरवली असताना दुसरीकडे ठाण्यातील स्थानिक नेत्यांनची अनुपस्थिती जाणवत होती महापालीकेत एकट्या सेनेचे ५३ नगरसेवक असताना त्यांचे केवळ सात ते आठ नगरसेवक व्यासपीठावर उपस्थित होते. यात सभागृहनेते नरेश म्हस्के यांच्यासह अनेक जेष्ठ नगरसेवकांनी या कार्यक्रमाकडे पाठ दाखवल्याने नेहमी राजकीय नेत्यांनी भरलेलं मॅरोथॉनचं व्यासपीठ रिकामच होतं. तसेच दरवर्षी या स्पर्धेला असणारी शिवसैनिकांची गर्दीही नव्हती. सेनेचे नगरसेवक महापौरावर नाराज आहेत ही नाराजगी या सर्व नगरसेवकांनी या स्पर्धेला अनुपस्थिती राहून दाखवून दिल्याचही बोललं जातेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.